कारवाई करण्याची मागणी 🔶🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷🔷
राज्य परिवहन महामंडळाच्या माणगाव – मुबंई एस. टी. बस मध्ये नागोठणे येथून पनवेल येथे जाण्यासाठी सकाळी ९.३० वाजता बसलेले प्रवासी वरवठणे येथील रहिवासी व अपंग व्यक्ती नारायण म्हात्रे यांना वाहक श्रीमती एस.एस.गमरे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे अपंग कायदा २०१६ अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी नारायण म्हात्रे यांनी नागोठणे एस. टी. वाहतूक नियंत्रकांकडे तक्रारी अर्जा मार्फत केली आहे.
याबाबत नारायण म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागोठणे येथे एस.टी.बस मध्ये नारायण म्हात्रे हे अपंग व्यक्ती बसल्यानंतर त्यांनी आपल्याकडील अपंग पास वाहकांकडे दाखवून त्यांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत असल्याने पनवेलचे एक चतुर्थांश तिकीट मागीतले. परंतु ते अपंग कार्ड फेकून देत वाहक श्रीमती गमरे यांनी हे लंगडे असेच शासनाच्या योजना लाटतात मी काय एक चतुर्थांश तिकीट देणार नाही. तुम्हाला पूर्ण तिकीट माझ्या नियमानुसार देणारच असे सांगितले.
त्यांनतर अपंग नारायण म्हात्रे यांना राग आला परंतु वाहक या स्त्री असल्यामुळे ते शांत बसले व त्यांनी पूर्ण तिकीट काढले ते पनवेलला उतरले. त्यानंतर त्यांनी पनवेल एस. टी. डेपो मधील तक्रार रजिस्टर मध्ये संबंधित वाहकांविरोधात तक्रार नोंदवली. ही तक्रार त्यांनी नागोठणे येथे करावी अशी माहिती त्यांना देण्यात आली त्यानंतर ते त्याच दिवशी नागोठण्यात आल्यानंतर त्यांनी नागोठणे येथील एस. टी. वाहतूक नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे.
दरम्यान या बाबतची माहिती समाजकल्याण अधिकारी व जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांना देखील कळवली असल्याचे नारायण म्हात्रे यांनी सांगितले.
याबाबत माणगाव एस. टी. डेपो व्यवस्थापक चेतन देवधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भात माझ्याकडे लेखी तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीची योग्य रित्या चौकशी करून माझा अहवाल पेण येथे पाठवीन असे सांगितले. तसेच जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना एसटी प्रवासात सवलत मिळण्यासाठी यापूर्वी समाजकल्याण विभागांतर्गत अपंग ओळखपत्र दिले जात असत त्यावर एसटी महामंडळाचा शिक्का घेतल्याने त्या दिव्यांग व्यक्तीस प्रवासात सवलत मिळत होती परंतु शासनाच्या नविन धोरणानुसार आता दिव्यांग व्यक्तींसाठी युडिआयडी. कार्ड हे ऑनलाईन दिले जात असल्याने हे काढण्यासाठी दिल्यानंतर ते दिल्ली वरून येई पर्यंत थोडासा कालावधी जात आहे
एसटी प्रवास करत असताना दिव्यांग व्यक्तींकडे आयडी कार्ड किंवा समाज कल्याण अपंग ओळखपत्र असल्यास त्यांना सवलत देणे गरजेचे आहे असे साईनाथ पवार यांनी सांगितले. दरम्यान एस. टी. वाहक श्रीमती एस. एस. गमरे यांचा मोबाईल नंबर उपलब्ध होऊ न शकल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही.








Be First to Comment