दोन किनारे…
दोन किनारे दोघे आपण
भेट न घडणे अपुले प्राक्तन
परी भेटीची ओढ लागता
होऊन जाते हळवे हे मन ।।१।।
याच किनारी आज अचानक
नाव प्रकटली त्या तीरातून
क्षेमकुशल ती पुसून तीरा
निरोप गेली त्याला सांगून ।।२।।
तीर सांगतो या तीराला
घडेल अपुले निश्चित मिलन
नकोस तोडू आस प्रीतीची
युगांतरीचे अपुले बंधन ।।३।।
कथन ऐकता त्या तीराचे
अंगची गेले सारे मोहुन
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावर
नयनी आले आसू दाटून ।।४।।
अशात एका रम्य सकाळी
अवचित आली गर्दी दाटुन
उमगत नव्हते दोघा काही
व्याकुळ झाले सारे तनमन ।।५।।
हात हजारो करू लागले
दोन तिरांवर सेतूबंधन
दोन किनारे उमगून गेले
सत्वर होईल अपुले मीलन ।।६।।
मनी उमटले बहू तराणे
जलदल गेले सारे ढवळून
रम्य प्रीतीची आस ठेवूनी
दोन किनारे गेले रंगून…. ।।७।।
©समीर खरे, पनवेल
8879737388







Be First to Comment