सिटी बेल लाइव्ह /पनवेल (साहिल रेळेकर)
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या चित्रपट, साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी सुप्रसिद्ध जेष्ठ लावणीसम्राज्ञी तथा सिनेअभिनेत्री सौ. मायाताई दत्तात्रय जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून माया जाधव यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे.
माया जाधव यांनी आजवर लावणीनृत्य कलेच्या माध्यमातून लोककला केवळ देशभरातच नाही तर सातासमुद्रापार परदेशातही पोहोचवली तसेच अनेक चित्रपट, मालिका, रिऍलिटी शो, अल्बम्स च्या माध्यमातून त्यांनी लावणीचे सादरीकरण केले आहे. तसेच अजूनही त्या लाईव्ह स्टेज शोज च्या माध्यमातून रंगमंचावर लावणी सादर करत असतात. लोककलेसाठी स्वतःला अर्पण करणाऱ्या मायाताईंनी आजवर अनेक कलावंत घडविले आहेत तसेच अनेक कलाकारांना योग्य मार्गदर्शन देखील त्या वेळोवेळी करत असतात.
परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे कलाक्षेत्र पूर्णपणे ठप्प आहे. हातावर पोट असलेले अनेक कलाकार आज घरीच बसून आहेत. लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आल्याने सर्व सेवाभावी, सामाजिक संस्थांनी कलाकारांच्या पाठीशी उभे राहण्याबाबतचे आवाहन देखील माया जाधव यांनी सर्वांना केले आहे.
राज्यासह देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कलाकारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोणत्याही नाटकांचे प्रयोग, लावणीचे कार्यक्रम, संगीत नृत्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वृद्ध कलाकारांना तर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी देखील घराच्या बाहेर पडता येत नाही त्यामुळे या विभागाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सौ. माया जाधव यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक यांच्या धोरणानुसार कलाकारांच्या पाठीशी नेहमीच उभी राहीन तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागाच्या माध्यमातून कलाकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे सदैव कटिबद्ध असेन असे प्रतिपादन सौ. माया जाधव यांनी केले आहे.
तसेच या झालेल्या नियुक्तीबद्दल विभागाचे पुणे जिहा अध्यक्ष प्रदीपदादा गारठकर व महाराष्ट्र प्रदेश समन्वयक संतोष साखरे यांचे मायताईंनी आभार मानले आहेत.
माया जाधव यांनी लावणी, लोककला व सिनेसृष्टीत आजवर गेली अनेक वर्षे सातत्याने दिलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









Be First to Comment