पत्रकारांना नाहक त्रास देणार्या पोलिसांवर कारवाई करा-पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती
पञकार देखील समाजासाठीचं जीवावर उदार होऊन घराबाहेर पडत आहेत : पञाकारांमध्ये संतप्त भावना
सिटी बेल लाइव्ह / पनवेल/प्रतिनिधी #
कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार हे समाजाची सेवा करीत आहेत. पत्रकारांमुळेच देशात काय परिस्थिती आहे हे सर्वसामान्यांना कळते. अशा समाजप्रबोधानाचे कर्तव्य बजावणार्या पत्रकारांना नाहक त्रास देणार्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे केली आहे.
कोरोना रुग्णसंख्या सगळीकडे वाढत आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉक डाऊनचा फायदा घेत काही पोलीस कर्मचारी हे व्यवसायिकांना, नागरिकांना अत्यावश्यक सेवेतील लोकांना अडवून अर्वाच्च भाषा वापरुन कायद्याची भिती दाखवत नाहक त्रास देत आहेत. अशा काही निवडक पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे अशा त्रास देणार्या पोलीस कर्मचार्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने केली आहे.
कोरोना या जागतिक महामारीमुळे देशात मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन राबवत सकारात्मक दृष्टी दाखवून जनतेला दिलासा दिला आहे. मात्र ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे त्या भागातील स्थानिक प्रशासनाने लॉक डाऊन जाहीर केला आहे. केंद्र व राज्य सरकारने ज्यावेळेस लॉक डाऊन जाहीर केले होते. तेव्हा देखील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाला संचारबंदीतून वगळयात आले होते. तसे आदेशही पारित करण्यात आले होते. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लॉक डाऊनचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये देखील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाला संचारबंदीतून वगळयात आल्याचे नमूद केले आहे. जिल्हाधिकारी रायगड यांनी देखील जाहीर केलेल्या लॉक डाऊनमध्येही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाला वगळले आहे. असे असतानाही व्दितीय आणि तृतीय श्रेणीतील पोलीस कर्मचारी हे केंद्रिय मंत्री, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याही पेक्षा मोठे अधिकारी आहेत का असा प्रश्न पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. जर देश, राज्य व जिल्हा पातळीवर संचारबंदीतून पत्रकारांना वगळले असताना देखील काही निवडक पोलीस जाणीवपूर्वक सर्वसामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत कायद्याचा धाक दाखवत दमबाजी करत आहेत अशा पोलीस कर्मचार्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने केली आहे.
Be First to Comment