निळी व्यथा
विषण्ण काळजातही तुझेच मौन व्यापले
क्षणैक दुःखभारही तुझ्या स्मृतीत रापले
कितिकदा पुकारले, तुला दिशादिशातुनी;
अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ?
तुझ्या उन्हात चांदणे, कितिकदा फुलायचे
तुझ्या सुरांतले बहर, अजून मोहरायचे
मनातली निळी व्यथा, दिली नदीत लोटुनी
अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ?
किती कितीतरी दुरून साद यायची मला
सलज्ज भास व्हायचा तुझा मला सुखातला
घडीत व्हायचा ऋतू, सचैल कंच श्रावणी !
अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ?
उरात लक्ष पाकळ्या, तुझ्याच गंधभारल्या
अजूनही तुलाच शोधतात सर्व सावल्या
सचित्र जागते अजून रात्र ती मनातुनी
अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ?
उडून रंग चालला, सुकून चालली फुले
रुतून आत-आत कोण नेमके मला सले ?
विचित्र-खिन्न वेळ त्यात तू; असा क्षणोक्षणी
अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ?
नभात दाटल्या जणू, विभक्त व्हायच्या खुणा
उगाच शीळ घालतो, अजून पंखपाहुणा !
मिटून जा मनातल्या मनात; शल्य होउनी…
अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ?
पूजा भडांगे लगदिवे, पुणे






Be First to Comment