माथाडी कामगार म्हणून स्थानिकांची भरती करण्याची मागणी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
वाकण पाली राज्य महामार्गावरील बलाप (ता.सुधागड) या गावाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या डी.जे. फूड अँड कंपनी कडून मालाचा चढ उतार करण्याबरोबरच इतर माथाडी स्वरूपाची कामे करण्यात येत आहेत. परंतू ही कामे करण्यासाठी बेकायदेशीरपणे परप्रांतीय कामगार ठेवण्यात आले आहेत. या कामगारांची कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कंपनीत स्थानिक माथाडी कामगार भरती न केल्यास डी.जे. फूड अँड कंपनी समोर मंगळवार दि. १० नोव्हेंबरला शासकीय नियमांचे पालन करुन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, नागोठणे यांच्यातर्फे संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड व उपाध्यक्ष दिनेश घाग यांनी सुधागडचे तहसीलदार दिलिप रायन्नानवार यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
तत्पूर्वी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डी.जे. फूड अँड कंपनी या कंपनीत स्थानिक माथाडी कामगारांची भरती करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कंपनी मालकांबरोबर विनंती करीत असतांनाही मालक चर्चा करण्यास तयार नाही तसेच स्थानिक माथाडी कामगारांना काम देेेेण्यासही तयार नाही असा आरोपही संतोष गायकवड व दिनेश घाग यांनी आपल्या निवेदनात केला आहे. या निवेदनाच्या प्रती सर्व सरकारी यंत्रनेला पाठविण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणी सुधागडचे तहसीलदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








Be First to Comment