Press "Enter" to skip to content

अर्थव्यवस्थेचा गाडा हळूहळू पूर्वपदावर

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रवास, उद्योगधंद्यांवर निर्बंध लादण्यात आले. याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. उद्योगधंदेच ठप्प झाल्यानं केंद्राला मिळणाऱ्या महसुलात प्रचंड मोठी घट झाली. त्यामुळे राज्यांना मिळणारा जीएसटीतील हिश्श्याची भरपाई करणं सरकारसाठी अवघड झालं. मात्र आता केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबरमध्ये केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्राला १ लाख ५ हजार १५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये सीजीएसटीमधून मिळालेल्या १९ हजार १९३ कोटी, एसजीसीटीमधून मिळालेल्या ५२ हजार ५४० कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या २३ हजार ३७५ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर सेसच्या माध्यमातून सरकारला ८ हजार ११ कोटी रुपये मिळाले आहेत.

गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी १० टक्क्यांनी वाढला आहे. आयातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात गेल्या महिन्यात ९ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. देशांतर्गत व्यवहारांचा विचार केल्यास या आघाडीवर महसूल ११ टक्क्यांनी वाढला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची तुलना केल्यास महसुलातील वाढ अनुक्रमे -१४ टक्के, -८ टक्के आणि ५ टक्के इतकी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.