- सावळे सरपंच अविनाश गाताडे, संतोष माळी ६ वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र 🔷🔶🔷
- सिटी बेल लाइव्ह । रसायनी । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
सावळे ग्रामपंचायतीमध्ये आढळून आलेली आर्थिक अनियमितता, ग्रामपंचायतीच्या नियमांचे उल्लंघन याबाबत सावळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप भोईर यांनी २०१७ साली तक्रार केली होती़. त्यानुसार तत्कालीन सरपंच अविनाश गाताडे, संतोष माळी यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे़.- याबातचे आदेश काेकण विभागीय आयुक्त अण्णाभाऊ मिसाळ यांनी दिले आहेत़ सप्टेंबर 2017 रोजी संदीप भोईर, यांनी याबाबतची तक्रार केली होती़ याबातचा सातत्याने पाठपुरावा देखील केला़.
- तहसीलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त असा पत्रव्यवहार करण्यात आला़. अखेर ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार उघडकीस आणण्यात यश आले आहे़. सावळे ग्रामपंचायतीची मुदत दिनांक २४.०८.२०२० रोजी संपली असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३, कलम ३९ चा पोट कलम ३४२) अन्वये तत्कालीन सरपंच व सदस्य संतोष बाळाराम माळी, अविनाश तुकाराम गाताडे यांना या दिनांकापासून पुढील ६ वर्षे कालावधीपर्यंत निवडणूकीस अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले आहेत़.
- तक्रार अर्जातील मुद्यांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणतेही काम करण्यापूर्वी मासिक सभेच्या ठरावाने मंजूरी घेऊन विविध कार्यपध्दती अवलंब करणे आवश्यक होते. तसेच ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाकरीता लागणारे साहित्य खरेदी केलेले असो किंवा लोक वर्गणीतून मिळालेले असो त्याची नोंद ग्रामपंचायतीकडील साठा रजिस्टरला घेऊन त्याचा विनियोग दर्शविणे नियमानुसार आवश्यक आहे. पाईपलाईनसाठी वापरलेले साहित्य ग्रामपंचायतीच्या साठानोंद रजिस्टरला न घेणे, तसेच गुरचरण व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत खात्री करुन शासन निर्णयानुसार कारवाई करणे आवश्यक असतानाही तशी कारवाई न करणे ही बाब महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३८ प्रमाणे तत्कालीन सरपंच व सदस्य यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी यामध्ये कसूर केल्याचे दिसून येते़. त्यामुळे जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार हे आदेश देण्यात आल्याचे कोकण आयुक्तांनी संगितले आहे.
माझ्यावर अविश्वास ठराव घेऊन माझे उपसरपंचपद घालवण्या मागचे मुख्य कारण आज जनतेसमोर आले आहे. सत्य कधी लपत नसते. मला निवडून देणाऱ्या ग्रामस्थांच्या विश्वासास मी कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला नाही़ यापुढेही जाऊ देणार नाही. आज मला हे एकनिष्ठेचे फळ मिळाले आहे. जनतेच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले़
संदीप भोईर,
माजी उपसरपंच, सावळे
पैशाने मते विकत घेता येतात, निष्ठावंतांची मने जिंकता येत नाहीत़ गावातील रहिवासी असलेल्या ग्रामस्थांना रहिवासी दाखले न देणे, स्वत:च्या स्वार्थासाठी ज्यांचा गावाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना सावळे ग्रामपंचायतीमधून दाखले देण्यात आले़ या दोन्ही भाजपवासी झालेल्या माजी सरपंचांची नियत यातून दिसून येते. आज आम्ही सर्वप्रथम न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो की, सत्य जनतेसमोर आले आहे. सर्व गोष्टी पैशाच्या जोरावर करता येतात, असे कोणी समजू नये़ येत्या निवडणुकीला तुमची जागा दाखवून देण्यास आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समर्थ आहोत.
सुधीर गाताडे
शेकाप युवा कार्यकर्ते.
स्वार्थापोटी राजकारण करणाऱ्यांना आज कुठे तरी आळा बसेल याची मला आता खात्री पटू लागली आहे. कोन सावळा रस्त्याचा सतत पाठपुरावा गेली कित्येक वर्षे आम्ही करत आलो आहोत. फक्त त्या मुद्द्यावर पक्ष प्रवेश करून जनतेची दिशाभूल करून निव्वळ स्वार्थाचे राजकारण आज संपुष्टात आले आहे.
राजुशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य








Be First to Comment