सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करू नये यासाठी जेएनपीटी कामगारांनी आज १ दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेएनपीटी बोर्ड मीटिंगमध्ये कंटेनर टर्मिनलचे खासगीकरणाचा ठराव स्थानिक कामगार व ट्रस्टीच्या विरोधामुळे बारगळला होता. यावेळी जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांनी कामगारांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. यामुळे कामगार वर्गात असंतोष पसरला होता.
शासनाच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ जेएनपीटी बंदरातील मान्यताप्राप्त युनियनने एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासनभवनाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उपोषण संपन्न झाले.
या उपोषणाला कामगार ट्रस्टी, युनियनचे पदाधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्ताने कामगारांची एकी दिसून आली.
यावेळी कामगार प्रतिनिधी दिनेश पाटील, भूषण पाटील व रवी पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना कंटेनर टर्मिनल हे जेएनपीटीचा आर्थिक कणा आहे. त्याचे खासगीकरण झाले तर जेएनपीटीचे खासगीकरणच झाल्यात जमा असल्याचे सांगितले. तसेच देशातील एकमेव शासकीय बंदर आहे. त्याचेही खासगीकरण करण्याचा डाव केंद्र सरकारने चालविला आहे. त्यापेक्षा अद्यावत यंत्रणा जेएनपीटी प्रशासनाने आणावी कामगार वर्ग नक्कीच उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सक्षम असल्याचा दावा त्यांनी या प्रसंगी केला.
कामगारांनी अशीच एकजूट कायम ठेवली तर शासनाचा खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यात यशस्वी होऊ. कामगारांच्या या आंदोलनाला राजकीय पक्ष ही पाठींबा देत असल्याने लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दिला.
परंतु कामगारांमधील काही नेतेमंडळी कामगारां समोर डरकाळ्या फोडतात तर दुसरीकडे साहेबांना मनवुन आपला स्वार्थ साधत असल्यामुळे जेएनपीटी प्रशासनाचे फावत आहे. तरी याचा बंदोबस्त करूनच कामगारांनी एकीची ताकद दाखवित निष्ठेने लढा उभारला तर प्रशासनाची खासगीकरण करण्याची कदापी हिंमत होणार नाही अशी चर्चा उपस्थित कामगार वर्गात सुरू होती.










Be First to Comment