प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाले विल्सन पानपाटील यांना मिळाले खेळते भांडवल ! 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव- कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷
कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून फेरीवाले यांना कोरोना काळात लॉकडाऊनमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाल्याने त्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा योजना सर्वत्र राबविण्यात येत आहे . त्यानुसार त्यांना १० हजार रुपयांचे खेळते भांडवल मिळत आहे . विल्सन पानपाटील – कर्जत शुक्रवार बाजार अध्यक्ष , यांना ही रक्कम युको बँकेकडून अदा करण्यात आली.
कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी , व मुख्याधिकारी पंकज पवार – पाटील , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी या योजनेसाठी फेरीवाल्यांना केलेल्या आवाहनानंतर अनेक फेरीवाल्यांनी पालिकेशी संपर्क करून आवश्यक ती कागदपत्रे समाविष्ठ केली होती . त्यानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांचा स्पॉट सर्व्हे करून खात्री केली व नंतरच त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले .
सदर कर्जावर आरबीआय च्या प्रचलित दरानुसार व्याजदर लागू रहाणार आहेत .
एक वर्षात कर्ज परतफेड केल्यास ७ टक्के व्याज अनुदान मिळणार आहे . तर ८७२ रुपयांचे १२ हफ्ते फेरीवाल्यांना परतफेड करायचे आहेत . पथविक्रेते कर्जत शुक्रवार बाजार अध्यक्ष विल्सन पानपाटील यांना सदर योजनेचा धनादेश देताना युको बँकेचे मॅनेजर प्रशांत काजरोळकर , बँक कर्मचारी राजपात्रा , फेरीवाले बापू गवळे , आदी उपस्थित होते . सदर योजनेसाठी कर्जत नगर परिषदेचे वृशाली शिंदे , बापू बहिरम , म्हसे आण्णा या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना सहकार्य केले .








Be First to Comment