कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांची मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड 🔶🔷🔶
राज्यपालांनी सिंधुताई सपकाळ यांना विधान परिषदेवर पाठवावे अशी मागणी कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 78 जागा आहेत. त्यापैकी 30 जागा विधानसभा सदस्य निवडून देतात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडले जातात. 7 पदवीधर मतदारसंघ आणी 7 शिक्षक मतदारसंघ यातून निवडून येतात.आणी 12 सदस्य नेमण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, सध्याच्या अशा बारा सदस्यांचा कालावधी पंधरा जूनला संपला आहे .
राज्यघटतील विशेष तरतुदी नुसार साहित्य, कला, विज्ञान, सहकार, किंवा सामाजिक क्षेत्रात विशेष ज्ञान अथवा अनुभव असलेल्या व्यक्तींना राज्यपालांनी नियुक्त करायच्या असतात.परंतु अनेक वर्षात सत्ताधाऱ्यांनी पराभूत राजकीय नेत्याचे पुनर्वसन करण्याकरता या जागांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
खरं म्हणजे विधान सभेतील 288 आणी विधान परिषदेतील 78 पैकी 66 जागा राजकीय व्यक्तीसाठी असताना राज्यपालांनी आपल्या अधिकाराने नियुक्त करण्याच्या जागा राजकारण विरहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना न दिल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत नाही. याला कारण म्हणजे बहुतेक राज्यपाल हे इतर राज्यांतून आलेले असतात. त्यांचे सुध्दा राजकीय पुनर्वसन झालेले असते त्यामुळे ते सत्ताधारी पक्षाच्या सल्ल्यानुसार राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्यास अप्रत्यक्ष मान्यता देतात.
सध्या सत्ताधारी पक्षात कोणाचे पुनर्वसन करायचे याबाबत चर्चा सुरू आहे.परंतु त्यापैकी साहित्य, कला , सामाजिक क्षेत्रांतील कोणाची वर्णी लागेल असे वाटत नाही. राज्यपाल यांनी कमीत कमी स्वतःच्या अधिकारात हजारो अनाथ बालकांची माता बनून त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांची निवड करावी. सिंधुताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी झाला. बालक दिनाच्या दिवशी जन्मलेल्या सिंधुताई यांनी स्वतःच्या मुलीला अनाथ मुली प्रमाणे वाढवले व त्यापासून बोध घेउन त्यांनी विविध संस्था स्थापन करून अद्याप पर्यंत कमीतकमी एक हजार अनाथ मुलांना वाढवले व त्यांचे पुनर्वसन केले.
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना सुमारे आठशे राष्ट्रीय आणी आंतराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना 1912 साली ” डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण ” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते .परंतु जर त्यांना राज्यपाल यांच्यातर्फे विधान परिषदेवर नियुक्त केले असते तर त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा सर्वाना झाला असता. 14 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे .
राज्यपालांनी सिंधुताईंना आपल्या अधिकारात विधान परिषदेवर पाठवल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना बनवताना जो उद्देश ठेवला होता तो साध्य होईल व राजकीय नेत्यांचे व अभिनेत्यांचे पुनर्वसन करण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्त्यानां प्रोत्साहन मिळेल .
ज्यांना हे विचार योग्य वाटत असतील त्यांनी राज्यपालांपर्यत हे विचार पाठवावेत अथवा पोस्टाने पत्र पाठवून सिंधुताईंना 14 नोव्हेंबरच्या वाढदिवसाची आगळी वेगळी भेट द्यावी ही अपेक्षा दिलीप प्रभाकर गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.








Be First to Comment