शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : ग्रामपंचायतीकडून सीसी टीव्ही कॅमेरे पूर्ववत करण्याची गरज 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
रोल मॉडेल नागोठण्याचा एक भाग म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी येथील छ. शिवाजी महाराज चौकात बसविलेले सीसी टीव्ही कॅमेरे गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी बंद पडले आहेत. हे सीसी टीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून दीड वर्षांपूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ते दुरुस्त न झाल्याने ग्रामपंचायतीचा हा तिसरा डोळा बंद पडून सध्या तर अडगळीत गेल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी याच छ. शिवाजी महाराज चौकाजवळच गुरे चोरणारी टोळी येऊन गेल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्याने त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील गुन्हेगारी रोखणे, वाहतुकीचे नियंत्रण, धूम स्टांईल वाहन चालविणारे चालक, बेशिस्तपणे करण्यात येणाऱ्या वाहनांची पार्किंग अशा विविध बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीकडून येथील सर्वात महत्वाच्या अशा व नेहमीच गजबजलेल्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकात चार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यानंतर अनेक महिने हे सीसी टीव्ही कॅमेरे सुरळीत सुरु होते. एक ठराविक अॅप आपल्या स्मार्ट मोबाईल मध्ये घेऊन त्यामध्ये आवश्यक ते सेटिंग करून कुणालाही हे सीसी टीव्ही कॅमेरे सुरु करता येत होते. त्यामुळे छ. शिवाजी महाराज चौकात कधीही, कोणत्याही वेळी काय चाललेय हे बघता येत होते. या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग नागोठणे पोलिसांनाही येथे घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी होत होता.
छ. शिवाजी महाराज चौकातील यापूर्वी सुरु असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा काही प्रमाणात का होईना सर्वांना वचक निर्माण झाला होता. याच छ. शिवाजी महाराज चौकासमोरूनच नागोठण्याची मुख्य बाजारपेठ सुरु होत असल्याने येथील व्यापाऱ्यांनाही चोरट्यांच्या पासून संरक्षण होण्यासाठी या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा आधार होता. मात्र सध्या हे सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्याने येथील छ. शिवाजी महाराज चौकात सर्वच बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने छ. शिवाजी महाराज चौकातील हे सीसी टीव्ही कॅमेरे सुरु करण्याबरोबरच शहरातील मीरा मोहिद्दीन शाह बाबा चौक, गांधी चौक, हायवे नाका येथील मुख्य प्रवेशद्वार, खुमाचा नाका, बाजारपेठ अशा विविध मोक्याच्या ठिकाणीही सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच नागोठणे ग्रामपंचायतीने रोल मॉडेल नागोठण्यासाठी राबविलेल्या योजना व सुविधा अखंडितपणे कशा सुरु राहतील याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी व्यापारी बांधव व नागरिक करीत आहेत.
शिवाजी चौकातील दुरुस्तीसाठी पाठविलेले सीसी टीव्ही कॅमेरे दुरुस्त होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्यासाठी परिसरातील कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडातून अद्ययावत सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत
– डॉ. मिलिंद धात्रक, सरपंच, नागोठणे.
नागोठणे ग्रामपंचायतीने येथील मुख्य ठिकाण असलेल्या शिवाजी चौकातील सीसी टीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरु करण्यासह शहरातील इतर मुख्य ठिकाणीही चांगल्या प्रतीच्या कॅमेऱ्यांची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी घटना घडल्यास संबधित आरोपींना जेरबंद करण्यास आम्हाला या कॅमेऱ्यांची मदत होईल
- दादासाहेब घुटूकडे, पोलीस निरीक्षक, नागोठणे
बाजारपेठेत भविष्यात चोरीसारख्या घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायतीने छ. शिवाजी महाराज चौकात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था लवकरात लवकर करावी
– प्रकाशशेठ जैन, अध्यक्ष - नागोठणे व्यापारी असोसिएशन








Be First to Comment