पोलादपूरकर वीजग्राहकांच्या मागण्यांबाबत ‘महावितरण’ही अनूकूल 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶
तालुक्यात गेल्या वर्षभरापासून महावितरण कडून ग्राहकांना सातत्याने विजपुरवठा खंडीत ठेऊन अंधारामध्ये ठेवण्याचा प्रकार घडत असून विजबिलेही प्रचंड प्रमाणात आकारली जात असताना सर्वत्र मोठया प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर सर्वपक्षिय उपोषणाचा मार्ग काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी राजिप सदस्य अनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखाली स्विकारून गुरूवार, दि.29 ऑक्टोबर 2020 रोजी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर या आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी बुधवारी तहसिलदार दिप्ती देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली असता हे सर्वपक्षिय उपोषण महावितरणकडून ग्राहकांच्या मागण्यांबाबत गांभिर्याने विचार करण्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आल्याचे अनिल नलावडे यांनी सांगितले.
पोलादपूर तालुक्यात आणि पोलादपूर शहरात 24 तासांपेक्षा जास्त आणि सुमारे चार दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहिल्यामुळे संतप्त भावना असताना कोरोना सदृश्य लॉकडाऊन परिस्थितीत घरी रोजगाराविना असलेल्या ग्राहकांना निसर्ग वादळाचा फटका बसला असताना अवाजवी विजबिलांची आकारणी केवळ मीटररिडींग न घेतल्यामुळे होऊन मोठा आर्थिक ताणही सहन करावा लागला. यामुळे संतप्त ग्राहकांपैकी माजी राजिप सदस्य अनिल नलावडे यांनी सर्वपक्षिय उपोषणाचा इशारा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला होता.
याबाबत, पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनी बुधवारी विचार विनिमय बैठक आयोजित करून सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, महावितरणचे डेप्युटी इंजिनियर एस.आर. सूद, निवासी नायब तहसिलदार देसाई, भाजप तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे, कोतवाल बुद्रुकचे माजी सरपंच महेश दरेकर, भाजप शहराध्यक्ष राजा दिक्षीत तसेच बाळकृष्ण चव्हाण, सचिन शेठ, जयेश जगताप आदींच्या उपस्थितीत ही विचारविनिमय बैठक सुरू झाली. यावेळी प्रारंभीच कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर उपोषण अथवा आंदोलन करण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह आवश्यक वाटल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची जाणीव करून देण्यात आली. यासोबत विद्युतग्राहकांच्या समस्यांबाबत चर्चा करताना महावितरणचे डेप्युटी इंजिनियर एस.आर. सूद यांनी कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगून ग्राहकांना विद्युतपुरवठा सुरळीत करून देताना ही मोठी गैरसोय ठरत आहे, अशी माहिती दिली.
यावेळी सूद यांनी तालुक्यातील दुरवस्थेतील विजेचे खांब बदलण्यासंदर्भात मागणी तसेच विद्युतपुरवठा एकाच वेळी संपूर्ण पोलादपूर शहरामध्ये बंद करून दुरूस्तीचे काम सुरू करण्याऐवजी जेथील दुरूस्ती तिथेच विद्युतपुरवठा खंडीत करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्याच्या मागणीला अनूकूलता दर्शविली आहे. ग्राहकांच्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक प्रसारित करून तातडीने दखल घेण्यासंदर्भातही महावितरणकडून अनुकूलता व्यक्त केली आहे.
या चर्चेनंतर गुरूवारी उपोषण आंदोलन करण्याचा इशारा राजिप सदस्य अनिल नलावडे यांनी मागे घेतला आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली संभाव्य जनक्षोभाची शक्यता टळली आहे.








Be First to Comment