Press "Enter" to skip to content

सम्यक क्रांती विचारमंचाचे तहसीलदारांना निवेदन 

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या  सुधागडातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने पाली सुधागड सह रायगड जिल्ह्याला झोडपले आहे. यामुळे येथील शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या भाताचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुधागडातील शेतकऱ्यांच्या भातपिकांची नासाडी झाली असून प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सम्यक क्रांती विचारमंचाच्या वतीने अध्यक्ष मंगेशभाऊ वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात मंगळवार दि.(27) रोजी पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, याचाही मायबाप सरकारने विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या काळात शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले होते,  घर, शेती, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले, या  संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भातशेतीचा पुन्हा घात केला. आठवडाभर झालेल्या पावसाने पीक मातीमोल झाले. पेरणी व कापणीचा खर्च ही निघणार नाही अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. जगावे की मरावे या द्विधामनःस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला शासन मदतीची अपेक्षा आहे. 

या संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मंगेशभाऊ वाघमारे, सीताराम पवार, रमेश जाधव, लक्ष्मण वाघमारे आदींसह पदाधिकारी उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.