रोहा फाटा ते वरवठणे मार्गे पोयनाड रस्ता दुरुस्त न केल्यास घंटानाद आंदोलन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
रोहा फाटा ते वरवठणे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यामुळे प्रवास करत असताना नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता येत्या दहा दिवसात दुरुस्त न केल्यास रोहा तालुका भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा रोहा तालुका भाजपाच्या वतीने सार्वजनिक बाधकाम खात्याला एका निवेदनामार्फत देण्यात आला आहे.
या निवेदनाची एक प्रत पेण-सुधागड विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनाही पेण येथील त्यांच्या कार्यालयात देण्यात आली. यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते मारुती देवरे, सुभाष पाटील, सिराजभाई पानसरे, राजेंद्र लवटे, संतोष लाड, तुकाराम राणे, वसंत कदम आदी उपस्थित होते.
रोहा तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, रोहा फाटा ते वरवठणे मार्गे पोयनाड रस्ता नादुरुस्त झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात अपघात होत असून जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सदरचा रस्ता येत्या दहा दिवसात दुरुस्त न केल्यास रोहा तालुका भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे. दरम्यान या रस्त्याच्या दुरस्ती संदर्भात संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले.








Be First to Comment