एम.एस.आर.डी.सी.प्रशासन व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे नेत्या लताताई कळंबे यांचे आमरण उपोषण सुरू 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
वाकण – पाली – खोपोली या राज्य महामार्गाचे नव्याने काॅक्रिटीकरण व रूंदीकरणाचे काम 2016 पासून सुरू आहे. 198 कोटी रूपयाचा निधी वापरून होत असलेल्या सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप जन माणसातून होत आहे. सद्यस्थितीत या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.
आजघडीला रस्त्याचे काम देखील बंद करण्यात आले आहे. एम. एस.आर. डी. सी. व संबंधीत ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरोधात सामाजिक कार्यकर्त्या तथा मनसे च्या रायगड जिल्हा सचिव लताताई कळंबे आक्रमक झाल्या आहेत. सदरचे रस्त्याचे काम पुन्हा चालू करावे यासाठी लताताई कळंबे यांनी दि.(26) सोमवार पासून महामार्गावर आंबोले गावानजीक पेट्रोल पंपासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
वारंवार प्रशासनाची केवळ पोकळ आश्वासने मिळत आहेत, मात्र कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही असे कळंबे यांनी म्हटले आहे. वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम बेग कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. मात्र या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांपासून पगारच दिलेला नव्हता. त्यामुळे आक्रमक झालेले कर्मचारी काम बंद करून पगार मिळण्यासाठी मनसे महीला रायगड जिल्हा सचिव लता कळंबे यांच्या समवेत गुरुवारी (दि.22) पासून पाली तहसील कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडून बसले होते.

अखेर शुक्रवारी (दि.23) सायंकाळी उशिरा कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एमएसआरडीसीने कामगारांना पगाराचा धनादेश दिला. आणि आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनाच्या यशानंतर लताताई कळंबे यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसह आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्व स्थरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार व पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी कळंबे यांची भेट घेतली व दूरध्वनीवर एम.एस.आर. डी. सी प्रशासनासंमवेत चर्चा करून काम जलदगतीने सुरू करण्यात येईल अशी ग्वाही दिली, मात्र प्रत्येक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याशिवाय उपोषण स्थगित करणार नाही असे आंदोलनकर्त्या कळंबे यांनी स्पष्ट केले. वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम मागील तीन ते चार वर्षांपासून सुरु आहे.

पाली खोपोली महामार्ग नव्हे डोंगर कड्याकपारीची वाट अशाप्रकारे जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. या महामार्गाने आजवर अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. महामार्गाचे रुंदीकरण होईल, प्रवास सुखरूप होईल या आशा आता फोल ठरल्या आहेत. महामार्गाचे काम दुर्लक्षित झाले आहे. मागील ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पध्दतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागून गेली.
पावसाळ्यात या मार्गावरील मोठमोठे खड्डे, दगडगोटे, तसेच चिखलाचा राडारोडा याने प्रवाशी जनता त्रस्त झाली आहे. सदस्यस्तीतीत या महामार्गाची प्रचंड दुदर्शा झाली असून हा मार्ग एकदाही प्रवास करण्यालायक राहिला नाही अशी परिस्तीती दिसून येत आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना जिव मुठीत घेवून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.

मोटारसायकलस्वारांसाठी तर हा मृत्यूचा सापळाच बनला आहे. रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत व विवीध समस्यांच्या चक्रव्युहात सापडलेल्या महामार्गाबाबत अंधकारमय परिस्तीती दिसून येत होती. त्यानंतर एम.एस.आर.डी.सी प्रशासनाने ठेकेदाराची खांदापालट केली. ठेकेदार मोनिका कडून बेग कन्स्ट्रक्शनकडे काम सोपविण्यात आले. तद्नंतर काही दिवस कामात प्रगती दिसून आली. मात्र रुंदीकरणाचे काम निकृष्ट व धिम्या गतीने झाल्याचे दिसून आले. तसेच आजघडीला रस्त्याचे काम ठप्प झाले आहे.
पावसाळ्यात प्रवाशांना जिवघेणा प्रवास करावा लागला. रुंदीकरणाच्या कामात ठिकठिकाणी रस्ता कापण्यात आला तर तरणतलावाप्रमाणे काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून अपघाताची परिस्थिती निर्माण झाली होती.
एम.एस.आर.डी.सी व स्थानिक प्रशासनाकडून जनतेच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम होत असल्याचा संताप लताताई कळंबे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपोषणस्थळी चिवे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच किरण साजेकर, भरत सिविलकर, चंद्रकांत ठाकूर, मनसे तालुकाध्यक्ष सुनिल साठे, मंगेश भाऊ वाघमारे, केतन म्हस्के, अभिजित चव्हाण, सचिन ठाकूर, रासळ उपसरपंच शिरीष मांढरे, रुपेश दळवी, आदींसह नागरिक, प्रवाशी उपस्थित होते.








Be First to Comment