उद्या ११.३० वाजता तहसिल कार्यालयात विचारविनिमय बैठकीचे आयोजन 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷
तालुक्यात गेल्या वर्षभरापासून महावितरण कडून ग्राहकांना सातत्याने विजपुरवठा खंडीत ठेऊन अंधारामध्ये ठेवण्याचा प्रकार घडत असून विजबिलेही प्रचंड प्रमाणात आकारली जात असताना सर्वत्र मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षिय उपोषणाचा मार्ग काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी राजिप सदस्य अनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखाली स्विकारला असून गुरूवार, दि. २९ ऑक्टोबर २०२० रोजी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर या आंदोलनास सुरूवात होणार आहे. मात्र, या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३०वाजता तहसिल कार्यालयात विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार दिप्ती देसाई यांनी येथे दिली.
पोलादपूर तालुक्यातील महावितरणच्या विद्युत पुरवठ्यासह विजबिलांबाबत ग्राहकांना प्रचंड मनस्ताप झाला असून यासंदर्भात गुढीपाडव्याच्या काळात सवाद, धारवली, कालवली, वावे, माटवण, हावरे व कणगुले या सप्तक्रोशीसह देवळे, गोवेले, कोंढवी, गोलदरा आणि पोलादपूर शहरात २४ तासांपेक्षा जास्त आणि सुमारे चार दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहिल्यामुळे संतप्त भावना आहेत. यानंतर कोरोना सदृश्य लॉकडाऊन परिस्थितीत घरी रोजगाराविना असलेल्या ग्राहकांना निसर्ग वादळाचा फटका बसला असताना अवाजवी विजबिलांची आकारणी केवळ मीटररिडींग न घेतल्यामुळे होऊन मोठा आर्थिक ताणही सहन करावा लागला.
याकाळात कोणत्याही ग्राहकाचे म्हणणे ऐकून न घेता विजबिले दोन अथवा तीन टप्प्यात भरण्याची मुभा देताना दुसऱ्या महिन्याचे बिलही अवाजवी देण्यात आल्याने ‘पावसाने झोडपले आणि राजाने मारले, तर दाद कुणाकडे मागायची’ अशी अवस्था पोलादपूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांची झाली. यासंदर्भात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल नलावडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या उपोषण आंदोलनाला टाळण्यासाठी तहसिलदार दिप्ती देसाई यांच्या दालनात उद्या बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याकामी महावितरणचे डेप्युटी इंजिनियरमार्फत विद्युत ग्राहकांना होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भात अहवाल मागविण्यात आल्याचे यावेळी तहसिलदार दिप्ती देसाई यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले.








Be First to Comment