सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही २४ तास तत्पर असल्याचे आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा चव्हाण आणि डॉक्टर अंकिता भोईर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले. गेले आठ महिने नागरिक कोरोनाच्या दबावाखाली असले तरी आता ग्रामीण भागातील भीती कमी झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिक आता सुरक्षित आहेत. कोरोनाची भीती जरी कमी झाली असली तरी नागरिकांनी बेसावध राहू नये शासनाकच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कारण आता सर्वत्र गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोलाड नाक्यावर मुंबई-गोवा महामार्गावर आहे. यापूर्वी इंदापूर ते सुकेली खिंड दरम्यान बरेच अपघात झालेले आहेत. अपघातग्रस्तांना एकतर आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागते. जास्तीत जास्त अपघात ग्रस्त आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येत असतात. त्यामुळे येथील डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागते. रात्री अपरात्री येथील महामार्गावर अपघात झाले की डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करावे लागतात. बऱ्याच वेळा रात्री दोनच्या सुमारास ग्रामीण भागातून विंचू दंश तसेच सर्प दंशाचे रुग्ण येतात.
मात्र येथील डॉ.कृष्णा चव्हाण आणि डॉ.अंकिता भोइर कोणत्याही प्रकारचा त्रासाची तमा न बाळगता रुग्णांसाठी पहाटेपर्यंत जागे राहून उपचार करत असतात. जर एखाद्या रुग्णाला सलाईन ची आवश्यकता असेल तर विनाशुल्क सलाईन लावतात. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना डॉक्टरांबद्दल आदर निर्माण झाला असून त्यांना दिलासा मिळाला आहे. आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोनही डॉक्टर त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्यामुळे रुग्ण कधीही आला तरी डॉक्टर उपचार करण्यास उपलब्ध असतात. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.







Be First to Comment