यंदा पालखी दारासमोरून गेली, मात्र आरती नाही, पालखीला स्पर्शही न करता भक्तांना दुरूनच दर्शन ! 🔶🔷🔶
कोरोना नियमांचे पालन करीत केवळ ४ तासांत पालखी सोहळा संपन्न ; पालकमंत्री -आमदारांची मंदिरात उपस्थिती 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔶🔷🔶
रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आज सोमवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर व पोलिस पथकाने ब्रिटिश काळा पासून सुरु असलेली श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. कोरोना नियमांचे पालन करीत आणि जिल्हाधिकारी रायगड यांनी केलेल्या सूचनांनुसार बंधूभेटी घेत केवळ चार तासांतच पालखी मंदिरात परतली. यंदा पालखी दारासमोरून गेली मात्र भाविकांना आरती आणि स्पर्श न करताच दुरूनच दर्शन घ्यावे लागले आहेत.दरवर्षी भल्यापहाटे हा सलामीसोहळा पाहण्यासाठी मंदीरात प्रचंड गर्दी होत असते, कोरोना नियमांमुळे ती यंदा फारच अत्यल्प होती.
या सोहळ्यासाठी पहाटे मंदिरात पालकमंत्री अदिती तटकरे,आम. अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी यशवंतराव माने, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कोलाटकर, कार्यवाह सचिन चाळके, नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष समिर शेडगे, लालता प्रसाद कुशवाह, संजय कोनकर, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, सुभाष राजे, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अमित उकडे, राजेश काफरे, नगरसेवक दिवेश जैन आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
धाविर मंदिरातून पहाटे मानवंदना झाल्यानंतर रथामधे दिमाखात निघालेली पालखी मोहला वेशी मार्गे बाजारपेठ,मारुती चौक,धनगर आळीतील खंडेरायाच्या मंदिरातून दमखाडी नाका,धनगर आळीतील धाकसुत मंदिरातून अंधार आळीतील गिरोबा मंदिराकडे व पुढे मेहंदळे हायस्कूल मार्गे संजय गांधी हॉस्पिटल,मोरे आळी,सोनार आळी बापूजी मंदिराची भेट घेऊन बाजारपेठ मार्गे पुन्हा धाविर मंदिराकडे मार्गस्थ झाली.
यंदा कोरोना पाश्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा झाला असला तरी या उत्सवानिमित्त मंदिराचा संपुण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता, पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. तदनंतर या वर्षी अलिबाग येथून मागविण्यात आलेल्या रथ सदृश्य वाहनामध्ये महाराजांची पालखी मार्गस्त झाली. शहरातील ठरवून दिलेल्या मार्गावरील मंदिरात बंधुभेट देत महाराजांची पालखी केवळ चार तासांच्या अवधीत मंदीरात परतली. यावेळी पून्हा महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात आली, यंदा पालखीचे जवळून दर्शन कोणाला घेता आले नसले तरी स्वागतासाठी शहरात ठीकठीकाणी फुलांनी आणी सढारांगोळयांनी रस्ते बहरलेले होतें.
अवघ्या रोहा तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री धावीर महाराजांचा तीस-तीस तास चालणारा पालखी सोहळा यंदा केवळ चार तासांत संपन्न झाले तसेच पालखीचे दर्शन दुरूनच घ्यावे लागल्याची वेगळी नोंद मात्र रोहेकरांच्या मनात कायम असणार आहे.
Be First to Comment