सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत उरण मधील नवशक्ति । लेखक – अजय शिवकर । 🔷🔶🔷
आजच्या देवीचे नववे रूप
सिद्धिदात्री
जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री.जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा,गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे ‘सिद्धी’.साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात.जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील.
तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल,तेंव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल.गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे.साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी. सिद्धीधात्री सर्व इच्छापुर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते.गुरुकृपेमुळे “प्राविण्य आणि मुक्ती”या सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत.
आजची उरणची नववी शक्ती
पाणजे गावची अक्कादेवी
उरणचे उत्तरेकडील शेवटचं टोक पाणजे गाव. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला गर्द जंगल. त्यावेळी ह्या भागात वाघाची खूप दहशत होती. देवीचे स्थान गावाच्या बाहेर असल्यामुळे बाहेर निघणे धोक्याचे होते. त्यावेळचा भगत अंबाजी जेठ्या पाटील याला दृष्टान्त झाला की देवीने वाघाला मारून गावकऱ्यांचा रस्ता मोकळा केला. तो येऊन पाहतो तर खरच देवीच्या समोरच तोंड फिरवून वाघ मरुन पडलेला होता.
पूर्वी ह्या भागात मीठ व इतर सामानाची ने-आण करण्यासाठी शिडाची मचवी सात होती. त्यापैकी अंबरनाथ नावाचा मचवा १९४७ साली तुफानात फसला व एक माणूस गमवता-गमवता वाचला तो अक्कादेवीच्या नवसाने. तेव्हापासून अंबरनाथ मचवा वाल्यांनी पालखी चालु केली. देवीच्या मागच्या बाजूला काळभैरव आहे म्हणून देवीला त्याची बहिण अक्कादेवी म्हणतात.
Be First to Comment