महिलांना स्वावलंबी करणारी चार्मिंग लेडिज संस्था : अडिच वर्षात 550 महिलांचा सहभाग 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । महाड । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती ही प्रभावीपणे ठासून असेल तर कोणतेही काम अवघड नाही. जीवनामध्ये अडीअडचणी येतात, एखादी संस्था उभी करायची असेल तर मनुष्यबळ अवश्यक असतेच. आणि एका महिलेने महिलांसाठी संस्था उभी करायची म्हणजे हे कार्य तेवढेच सोपं नाही. तरी देखील महाड मधील विणा महामुणकर यांनी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी चार्मिंग लेडिज संस्थेचे बिज रोवले.
चार्मिंग लेडिज या संस्थेच्या महामुणकर यांनी 2018 साली केवळ 75 महिलांना सोबत घेवून सुरुवात केली होती. बघता, बघता आता 550 महिला सभासद आहेत. या संस्थेचा उद्देश सांगताना सौ.महामुणकर यांनी सांगितले की, प्रत्येक महिला स्वावलंबी बनली पाहिजे. तीने आपला स्वतंत्र उद्योग सुरु करावा आणि त्या उद्योगात तिला लागणारे सहकार्य व मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून करुन तिच्या उद्योगाची जाहिरात या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व सभासदांकडून वॉटस्अप मेसेज व स्टेटस मधून त्याची प्रसिध्दी होत आहे. त्यामुळे या संस्थेमधील अनेक उद्योजक महिलांचे उद्योग भरभराटीला आले आहेत.
कोविड महामारीमध्ये कोणीही घराबाहेर पडत नव्हते त्यादरम्यान या संस्थेने आपल्या सभासदांना ही नामी संधी उपलब्ध करुन दिली त्यामुळे होम डिलिव्हरी होत असलेल्या मालाला मागणी वाढली होती, त्यामुळे देखील चांगला आधार या महिलांना मिळू शकला. गेली सात महिने कोविड माहामारीमध्ये कोणतेही फेस टु फेस उपक्रम राबविता आले नसले तरी व्हॉटस्अपच्या माध्यमातून सभासद महिलांच्या व्यवसायाची जाहिरात सुरु आहे. त्यामुळे सभासद महिलांमध्ये चांगला उत्साह निर्माण झालेला आहे.
मुळात चार्मिंग लेडिज हा ग्रुप उद्योजिका महिलांना आधार या प्रमुख उद्देशाने बनलेला असून त्यामुळे उद्योगात होणारी प्रगती व महिला निश्चितच स्वावलंबी होतील आणि त्याची सुरुवात या संस्थेच्या माध्यमातून होवून अनेक महिलांनी आपल्या व्यवसायात झालेली प्रगती संस्थेला कळविली आहे. आधी दोन वार्षिक समारंभ घेऊन त्यात ‘चार्मिंग महिला उद्योजिका’ व इतर बक्षिसे देऊन तसेच या लॉकडाऊनच्या काळात इतर व्यवसायासंबंधित ऑनलाईन स्पर्धा आयोजित करून जणू महिलांना त्यांच्या कामाची पोच पावती देण्याचा प्रयत्न करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला जो व्यवसाय करीत आहेत त्यासाठी चार्मिंग संस्थेकडून कमीत कमी खर्चात उद्योग आधार व फूड लायसन्स काढून देण्यासाठी ‘मी उद्योजिका’ हा उपक्रम राबविला.
सद्या सुरु असलेल्या नवरात्रौत्सव दरम्यान या संस्थेने एक नाविन्यपूर्ण कल्पना राबविली आहे. प्रत्येक सभासद महिला आपल्या मोबाईल मधील व्हॉटस्अपच्या माध्यमातून “मी आदिशक्ती” या मथल्याखाली आपल्या उद्योगाची प्रसिध्दी देत असून कुठेही आणि कोणत्याही व्यवसायात महिला कमी नाही आणि ती अबला नाही तर सबला आहे. हा उद्देश अधोरेखीत होत आहे.
चार्मिंग लेडिज ग्रुपची निर्मिती केल्यावर विणा महामुणकर यांनी निता शेठ, नमिता दोशी, पूजा जगताप यांना आपल्या सोबत घेवून उभा केलेला हा ग्रुप अवघ्या अडिच वर्षात जवळजवळ महाड शहरात पसरला आहे. ग्रुपची निर्मिती आता उद्योजिका महिलांसाठी एक आशेचा किरण तर ठरत आहेच त्याचबरोबर घरबसल्या आपल्या व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देखील मिळत असून महिलांना एकजुटीची ताकद देखील मिळत आहे. तर अनेक महिला या ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधत आहेत. असे सांगून उद्योजिका महिलांसाठी स्थापन केलेल्या या ग्रुपने अनेक महिलांना आधार तर दिलाच आहे. त्याचबरोबर अनेक महिलांना उद्योजिका देखील बनवले आहे. तर सभासदांपैकी कित्येक महिलांना यशस्वी उद्योजिकता देखील होता आले आहे. हे सर्व श्रेय या ग्रुपपेक्षा त्या उद्योजिका महिलांना जात आहे. असे देखील सांगितले.







Be First to Comment