Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी किल्ल्यावर साजरा होणार दसरा उत्सव

गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्यभर शेकडो मावळे, अनेक संस्था करीत आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । उरण । घनश्याम कडू । 🔷🔶🔷

गडकिल्ले ही महाराष्ट्राची ऐतिहासिक संपत्ती. ती जपण्यासाठी व गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्यभर शेकडो मावळे व अनेक संस्था प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दसऱ्याला गडावर तोरण लावण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. त्याच धर्तीवर उरणमधील सुप्रसिद्ध द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा उत्सव मोठ्या उत्साहात दुर्ग मावळा प्रतिष्ठान, नवपरिवर्तन ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साजरा करण्यात येणार आहे.

गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पूर्णपणे शासनावर अवलंबून न राहण्यापेक्षा राज्यातील अनेक शिवप्रेमी संस्थानी श्रमदानातून गड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. वर्षभर श्रमदान मोहिमांचे आयोजन करून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दसरा, दिवाळी, नववर्ष स्वागत व इतर कार्यक्रमही गडावर आयोजित केले जात आहेत. दसऱ्या दिवशी गडावर तोरणे लावण्याची परंपरा जोपासली जात आहे. बहुतांश किल्ल्यांवर हे सण उत्साहाने साजरे केले जात आहेत.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील द्रोणागिरी गडावर दसरा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सकाळी ६ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराजांच्या प्रतिमेचा अभिषेक व पूजन, जुना ध्वज सन्मानपूर्वक खाली काढून नवीन ध्वजाची स्थापना करणे, ध्वज पूजन करणे, महादरवाजाचे पूजन, प्रत्येक मोहिमेत वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचे पूजन, गडावर कचरा कुंड्यांचे लोकार्पण सोहळा, गडफेरी आणि गडाविषयी माहिती देण्यात येणार आहे.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान, नवं परिवर्तन ग्रुप व सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे गडावर जाणारी बिकट वाट श्रमदानातून व्यवस्थित केली आहे. तसेच नवपरिवर्तन ग्रुपतर्फे गडावर जाण्यासाठी मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आले आहे.

तरी सर्व शिवभक्त,शिलेदार, स्थानिक सामाजिक संस्था, स्थानिक रहिवाशी ह्यांनी दसरा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली परंपरा जपण्याचे आवाहन संबंधित संस्थानी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.