सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
संपुर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांचेे पुर्णत: तयार झालेल्या भातपिकांचे प्रंचड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भातशेतीचे लोकप्रतिनिधी, तहसील, प्रांताधिकारी यांच्यातर्फे पंचनामे करण्याचे कामही सुरु झाले आहे. पंरतु काही महिन्यांपुर्वी झालेल्या चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना अद्यापही सरकारकडुन मदत मिळाली नसल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भातशेतीचे जे नुकसान झाले आहे त्यांना तात्काल कशी मदत मिळणार ? त्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम नुकसानग्रस्त शेतकरीवर्ग हवालदिल होऊन शासनाच्या या चालढकल कारभाराविषयी नाराज होऊन संताप व्यक्त करत आहे.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणुन मानला जातो. जिल्ह्यातील वरकस भुभाग वगळता बहुतांशी सखळ क्षेत्र भातपिकाच्या लागवडीखाली येते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गांचे भवितव्य हे शेती व्यवसायावर अवलंबुन असते. पंरतु निसर्गाच्या या अस्मानी संकटापुढे शेतकरी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सद्यपरिस्थितीत भातशेती पुर्णत: परिपक्व झालेली असतांना परतीचा पाऊस संपुर्ण रायगड जिल्ह्यात ठाण मांडुन बसल्यामुळे शेतक-यांच्या हाता- तोडांशी आलेला हा घास परतीच्या पावसाने अक्षरश: हिरावुन घेतला आहे. त्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सदर नुकसानीचे पंचनामे शासनाच्या माध्यमातुन केले जात आहेत. मात्र काही महिन्यांपुर्वीच झालेल्या चक्री वादळातील नुकसानग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे भात नुकसानीचे पंचनामे देखील को-या कागदावरच राहणार की काय असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. त्यामुळे शासनाच्या या चालढकल कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनामुळे तसेच नैसर्गिक आणि अस्मानी संकटाने त्रस्त असलेला रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग शासनाच्या नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आम्ही आता खायचे काय, घरखर्च कसा चालवायचा, बि -बियाणे मजुरी यासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे या चितेंने शेतक-यांना पुरते ग्रासले आहे.
त्यामुळे शेतक-यांच्या या गंभीर परिस्थितीत शासनाने आता कोणतेही कारण पुढे न करता या सर्व शेतक-यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गांतुन होत आहे.







Be First to Comment