विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आ.प्रवीण दरेकर यांची टीका 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷
राज्यातील महाआघाडी सरकारने जाहिर केलेली 10 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अत्यल्प असून शेतकऱ्याच्या दाढेलाही पुरणार नाही. कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे असलेली जमीन धारणा अल्यत्प आहे. परिणामी, शेतकऱ्यापर्यंत गुंठयाला शंभर रूपये मदत जरी पोहोचली तरी शेतातील पिकाची नासाडी साफ करण्यासाठीच त्यापैकी पन्नास रूपये जातील. लॉकडाऊनच्या काळात गावाकडे रोजगाराविना आलेला शेतकरी महाआघाडीसरकारकडे मोठया अपेक्षेने भरीव नुकसानभरपाईची अपेक्षा धरून बसला असताना राज्यातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांच्या तुलनेत भ्रमनिरास करणारी घोषणा आहे, अशी जळजळीत टीका विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आ.प्रवीण दरेकर यांनी येथे केली.
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक भवानवाडीतील अंकूश सकपाळ यांच्या शेतावर जाऊन आ.दरेकर यांनी भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली असता ते प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलत होते. यावेळी आ.दरेकर यांच्यासमवेत तालुकाअध्यक्ष प्रसन्ना पालांडे, शहरअध्यक्ष राजा दिक्षित, एकनाथ कासुर्डे, निलेश चिकणे, महेश निकम, समीर सुतार, माजी राजिप सदस्य अनिल नलावडे, राजू धुमाळ, नारायण साने, महाडचे भाजपा अध्यक्ष जयवंत दळवी, तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ आणि अन्य मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले होते. या महाआघाडी सरकारने घोषणा करायची म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेने शेतकरी आपल्या दुखातून बाहेर पडणार नाही. लाखो एकर जमिनी बाधित झाल्या आहेत हे लक्षात घेऊन जे पॅकेज निवडणुकीपूर्वी कोरडवाहूला 25 हजार, बागायतीला 50 हजार आणि फळपीकला 1 लाख रूपये जाहिर केले होते त्याची वचनपूर्ती मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी जाहिर केलेल्या पॅकेजने होणार नाही, 10 हजार कोटींच्या पॅकेजमधील रस्ते पूल व अन्य पायाभूत सुविधांसाठी जो निधी जाईल तो पाहता शेती व फळपीकासाठी केवळ पाच-साडेपाच हजारांची मदत होऊ शकेल, त्यामुळे ही पॅकेजची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असे यावेळी आ.प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
पोलादपूर येथील कापडे गावातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी आले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेतीचे नुकसानीची पाहाणी केली. यासंदर्भात आमदार दरेकर यांनी पोलादपूर विश्रामगृहामध्ये प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दिप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई यांना पोलादपूर तालुक्यातील शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची संख्या आणि त्यांची शेतजमीन तसेच अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान यांच्या संदर्भातील टिपणी करून पाठवण्यास सांगितले.
यानंतर आ.दरेकर यांनी रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्याला सुरूवात केली.







Be First to Comment