आंबिया बहारासाठी विमा योजना लागू, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : तालुका कृषी अधिकारी रवींद्र कांबळे 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । रामचंद्र घोडमोडे । 🔷🔶🔷
प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत फळबागांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठीच्या हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२० ला आंबिया बहारामध्ये राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. कोकण विभागातील आंबा व काजू या फळपिकांसाठी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीवर्धन, राविंद्र कांबळे दिली आहे.
पाऊस, तापमान, आर्द्रता, गारपीट आदी हवामानाच्या धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण या दोन फळपिकांना मिळणार आहे. योजनेत कुळाने, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. कर्जदारांना व बिगर कर्जदारांना ही योजना ऐच्छिक असणार आहे.रायगड जिल्ह्यसाठी बजाज अलायन्झ जनरलइन्शुरन्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १८६६६७ रु असून विमा हप्ता ९३३३ रु आहे.तर काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १३३३३३ रु असून विमा हप्ता ६६६७ रु आहे.या विमा हप्त्यामध्ये गारपीट धोक्याचा समावेश करण्यात आला आहे जर शेतकऱ्यांना गारपीटसाठीचा विमा उतरवायचा नसेल तर विमा हप्ता कमी होऊन आंबा व काजू पिकासाठी अनुक्रमे ७००० व ५००० रु एवढा विमा हप्ता भरावा लागेल तसेच जमीन भूधारणेच्या मर्यादेत एक शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे तसेच केवळ उत्पादनक्षम फळपिकांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार असल्याने आंबा व काजू पिकासाठी ५ वर्ष वय हे उत्पादनक्षम वय म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा अर्ज, ७/१२ उतारा,८अ उतारा,फळबाग लागवड दाखला, बँक पासबुक झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स ई. कागदपत्रे आवश्यक आहेत.आंबा व काजू या फळपिकांचा विमा उतरवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० असून शेतकरी बांधवांनी विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक,वित्तीय संस्था यांचेशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा सध्याचा वातावरणातील बदल पाहता फळपिकांसाठी विमा संरक्षण आवश्यक झाले आहे त्यामुळे तालुक्यातील ज्यास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी श्रीवधन कार्यालय (०२१४७-२२२०७४) किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रवींद्र कांबळे यांनी केले आहे.







Be First to Comment