बिल्डरच्या विरोधात उपोषणास बसलेले भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांना न्याय देण्यासाठी रिपाइंचे नेते जगदीश गायकवाड आक्रमक 🔶🔷🔶
बिल्डरने बांधलेल्या बंगल्याचा घेणार ताबा 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
सुधागड तालुक्यातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांनी बिल्डर पागुर देसाई यांच्या विरोधात सोमवार (दि.19) पासून पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पाचव्या दिवशी शेतकरी पवार यांची प्रकृती खालावली. याबरोबरच प्रशासनाकडून याबाबत कोणतीच सकारात्मक हालचाल न झाल्याने व चर्चा निष्फळ झाल्याने रिपाइंचे नेते भाई जगदीश गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्याच्या जागेवर बांधलेल्या बंगल्याचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला.
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो ही बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. खबरदार.. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न कराल तर…. रिपाईशी गाठ असेल असा इशारा जगदीश भाई गायकवाड यांनी दिला.
केवळ सुधागड नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर रिपाइं व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल असा इशारा गायकवाड यांनी भांडवलदार, विकासक व धनिकाना दिला.
पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या दालनात याप्रकरणी तब्बल तीन तासाहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण असल्या बाबतचा अहवाल या आधी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला होता. तसेच अलिबाग जिल्हा न्यायालयात याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्र (affidavit) सादर केले होते. याबरोबरच 2010 मध्ये पाली तहसील कार्यालयात झालेल्या प्रतिज्ञापत्राबाबत चिंतामण पवार यांनी हरकत घेतली आहे. त्याबाबत चौकशीचे करण्याचे आश्वासन याआधी देखील आम्ही दिले होते. आणि ते आम्ही करणार आहोत असे पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.
यावेळी रिपाइं कोकण प्रदेश अध्यक्ष जगदिशभाई गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, रिपाइं जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ,तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, कार्याध्यक्ष भगवान शिंदे, रिपाइं जेष्ठ सल्लागार सुनील गायकवाड, रिपाइं रोहा तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, दिलीप जाधव, युवाध्यक्ष निशांत पवार, आदेश कांबळे, सतीश गायकवाड, हेमंत गायकवाड, दिलीप मोरे, राहुल महाडिक,संतोष साळुंखे, सुशील गायकवाड, सिद्धांत गायकवाड, विवेक रोकडे,भीम महाडिक, अमृत गायकवाड, मनोज साळुंखे, सुभाष मोते, प्रशांत वाघमारे, विजय वाघमारे, निलेश शिर्के,अमोल पवार,सचिन साळुंखे, रामदास मोरे आदी उपस्थित होते.







Be First to Comment