Press "Enter" to skip to content

भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी भिसेगावची जय अंबे भवानी माता ! 

सिटी बेल लाइव्ह । नवरात्र विशेष । भिसेगाव – सुभाष सोनावणे ।

 हिंदू धर्मात भक्तीपन्थाचे स्थान फार मोठे आहे . देवी -देवंताचे श्रध्दा ठेवून जर त्यांच्या नामाचा जप , सत्सेवा , सत्पात्रे , दान केले खडतर प्रारब्धसुध्दा आनंदी होते.कलियुगात वेगाने चालत असलेल्या जीवनात ईश्वरी शक्ति पूरक ठरत आहे.सर्वांचे आयुष्य आनंदमय करणारी व संकटाच्या वेळी हाक मारली असता पावणारी अशी ही कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथील आदिशक्ती श्री अंबे भवानी देवीस त्रिवार वंदन करण्यास सर्व भक्तगण एकच गर्दी करत आहेत.

भिसेगाव हे भिसे खिंडीच्या पायथ्याशी आहे.पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होते.व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई -पुणे मार्गाकडे जाताना या खिंडीच्या मार्गाने जात.येथील विहिरी जवळ रात्री मुक्काम करून सकाळी प्रवासाला निघत.वरती डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती.एके दिवशी एका गुजराथी व्यापाऱ्याला मुक्कामाला असताना स्वप्न पडले.

स्वप्नात देवीचे दर्शन झाले.मी या विहिरी जवळील वारूळात आहे.मला बाहेर काढ , माझ्या सोबतीला एक काळा नाग आहे.तो तुम्हाला काही करणार नाही.या स्वप्नाकडे लक्ष न देता व्यापारी व्यापारासाठी पुढे निघून गेला.काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो मुक्कामाला आला असता तसाच दृष्टांत पुन्हा झाला.

हा सर्व वृत्तांत त्याने आपल्या व्यापारी मित्रांना सांगितला.या सर्व व्यापारी मित्रांनी मिळून सत्य शोधण्याचे ठरविले.डोंगर माथ्यावरिल आदिवासींना मदतीला बोलावून घेतले.सर्वजण वारुळ फोडण्यासाठी जमले असता त्या वारुळातुन तो काळा नाग आपोआप बाहेर निघून गेला.आदिवासी लोकांनी ते वारूळ फोडले , तो काय आश्चर्य ! खरोखर देवीची सुन्दर रेखीव मूर्ती त्यातून बाहेर पडली.ती मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला.

आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले.तेंव्हापासून येता जाताना पूजा करून दर्शन घेऊन पुढे जात असत.ही देवी कोणती ? अस कुतुहल लोकांच्या मनात निर्माण झाले.तेंव्हा ज्या आदिवासी माणसाने वारुळास प्रथम हात लावला , त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की , मी गुजरात येथील अबूच्या पहाड़ावरील श्री अंबे भवानी आहे.तेंव्हापासून या देवीला श्री अंबे माता असे लोक म्हणू लागले.आणि भक्ति-भावाने तिच्या भजनी पूजू लागले.
आज भिसेगाव येथे निसर्गरम्य परिसरात तसेच कर्जत रेल्वे स्टेशन व बस डेपोपासुन दोन मिनिटाच्या अंतरावर भिसेगाव येथे श्री अंबे भवानी मातेचे भव्य मंदिर आहे.

अत्यंत जागृत व नवसाला पावणारी तसेच भक्तांच्या हाकेला धावणारी अशी प्रसिध्द आहे.त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देवीचे भक्त येत असतात.दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येत वाढ झाली असून आत्ता हे मंदिर भव्यदिव्य झाले आहे . नवरात्रीत नऊ दिवस महिलावर्ग भक्ती भावाने पूजेस येतात .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.