मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचे बेळगाव जिल्हा प्रशासनाचे आदेश 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । रायगड । आदित्य कडू । 🔶🔷🔶
अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा पुण्यतिथी उत्सव अश्विन वद्य २ ते ४ या तिथीला श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे दरवर्षी साजरा होतोे. या वर्षात संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने सर्वत्र सण, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
या उत्सवासाठी दरवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व मध्यप्रदेश या राज्यातून लाखो पंतभक्त येत असतात. या वर्षीच्या उत्सवाच्या तारखा २ ते ४ नोव्हेंबर २०२० अशा निश्चित केलेल्या असल्या तरी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दत्त संस्थान बाळेकुंद्रीच्या विनंतीस मान देऊन परंपरेनुसार चालत आलेला हा उत्सव यावर्षी सांकेतिक स्वरूपात श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील मंदिराच्या आवारातच मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत फक्त एका दिवसातच कोरोना सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अगदी साधेपणाने साजरा करावा अशी अट घातलेली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव, बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाने श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्रीचा परिसर उत्सवासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. या तिन्ही बाबींचा विचार करता यावर्षी श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करत नसल्यामुळे उत्सवासाठी कोणीही श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे येऊ नये अशा सूचना बेळगाव जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत.
श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे उत्सव साजरा होणार नसला तरीही सर्व पंतभक्त व गुरूबंधूंनी २ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत आपापल्या घरी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव साधेपणाने व श्रध्देने कोरोना सुरक्षा संबंधातील सर्व नियमांचे पालन करून या संकट काळात आपली सेवा श्रीपंत चरणी रुजू करावी असे आवाहन श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्रीचे अध्यक्ष परमपूज्य राजन पंतबाळेकुंद्री यांनी केले आहे.
Be First to Comment