मायबाप सरकार हो आता श्वास गुदमरलाय !
जगात करोनाने थैमान घातलंय। विश्वाचा आकडा तेरा कोटीच्या घरात गेलाय। अमेरिका सारख्या बलाढ्य देशात 33 लाख रुग्ण संख्या आहे। ब्राझील सारख्या छोट्या देशात 18 लाख करोना बाधित आहेत।आपणही लवकरच दहा लाखाच्या घरात पोहोचणार आहोत। आपली ही संख्या करोना वर लस आणि औषधांचा शोध लागे पर्यंत चाळीस -पन्नास लाखा पर्यंत जाईल असा संशोधकांचा अंदाज आहे। मृतांचा आकडा काही लाखांच्या घरात असेल। जगात 56 लाख लोकांनी इहलोक सोडलाय।आपल्या एवढा लॉक डाऊन जगात कोणी केलेला नाही।लोकांना घरात डांबून आपण संख्येवर नियंत्रण मिळवलं आहे।म्हणजे महामार्गावरील ट्राफिक बंद करून शून्य अपघात संख्या करण्यासारखं हे आहे।मायबाप सरकार हो आता करोना सोबत जगायचं असं एकदा तुम्ही जाहिरच करून टाकलं आहे तर मग हे लॉकडाऊनचे पाढे कशासाठी ?। मायबाप सरकार हो। तुम्ही पहिल्यापासून लागू केलेला लॉकडाऊन हा आमच्या साठी कधी नव्हताच। आमच्या प्रेमापोटी नाही। आमची काळजी आहे म्हणून तर मुळीच नाही। तर हे लॉकडाऊन हे केवळ तुमच्या साठी आहेत। तुमची आरोग्य यंत्रणा उभी करण्यासाठी आहेत। त्यातून मलई खाण्यारे पण आहेत। हे लॉकडाऊन नावाचं शस्त्र आमच्या साठी नाही हे कळून चुकलंय आम्हाला। संपूर्ण देशाचीच आरोग्य यंत्रणा इतकी तोकडी आहे की आणखी शंभर लोकडाऊन केले तरी सर्वांना उपचार मिळतील याची कोणतीच खात्री नाही। म्हणूनच आजही रुग्णांना बेड मिळत नाहीत। औषधें कमी पडत आहेत। वेळेवर रुग्णवाहिका नाहीत। तेव्हा मायबाप सरकार हो, आता पुरे झाले तुमचे प्रयत्न। गेली चार महिने तुम्ही खूप केलंत आमच्यासाठी। आता रोगापेक्षा इलाज जालीम वाटू लागलाय। पुरेशी रुग्णालये नाहीत म्हणून लॉकडाऊन च्या निमित्ताने आमची घरं तुम्ही रुगणालये करून टाकलीत। पाहिले काही दिवस आम्हीही सहन केलं। आम्हाला ही मजा वाटली। नवनवीन डिश करून खाल्ल्या। राहिलेली कामं केली। मृत्यूपत्र पण लिहून ठेवली। फॅमिली बरोबर टाइम स्पेन्ड केला।नको त्यांना फोन करून काळजीचा दिखाऊपणा केला पण आता घरं जेल वाटायला लागली आहेत। गेली चार महिने रस्त्यावर न फिरकणारे आता आम्ही रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे। घरात हवेहववसे वाटणारे आम्ही आता नकोसे वाटू लागलो आहेत। घरातील महिला घरचं करून वाकल्या आहेत। सर्वांचीच चिडचिड वाढली आहे। टेन्शन डोक्यात पिंगा घालू लागलंय। पोरांचा जीव काकुळतीला आलाय। सात पिढ्यांची कमाई करून ठेवणारे आणि सात पिढ्या भीक मागायची तयारी ठेवणारे सुखी आहेत। गमावण्या सारखं त्यांच्या कडे काहीच नाही। आमच्या सारखा स्वाभिमानी मध्यमवर्गीय ‘ना घर का ना घाट का’ असा झाला आहे। घरांचे, गाडीचे हप्ते, मुलांच्या फिज, सोसायटीचे मेंटेनन्स, पाणी लाईट बिल, आजारपण, चार माणसांचे पोट भरण्यासाठी घराबाहेर पडावच लागेल। जगण्यासाठी काय पण करावं लागतं साब।मायबाप सरकार हो। विचार करून डोकं भंडावून गेलंय। वेतन कपात, नोकरी जाण, धंदा चौपट होणं यामुळे झोप लागेनासी झालीय। टू बी ऑर नॉट टू बी’ जगावं की मरावं असा प्रश्न निर्माण झालाय। लॉकडाऊनचा पाहिला काळ’ हे ही दिवस जातील’ असं म्हणत आम्ही सर्वानीच काढला। टाळ्या थाळ्या दिवे आवडीने लावले पण आता सहन होत नाही आणि सांगता येत नाही। अशी स्थिती झाली आहे।तेव्हा मायबाप सरकार हो। सोडा आम्हाला आमच्या “हाल’ वर। घेऊ आम्ही आमची काळजी नाहीतर नोकरी धंदा नावाची लढाई लढता लढता शहीद होऊ। ज्याला जगायचं आहे तो काळजी घेईल। ज्याला मरायचं आहे तो निष्काळजी राहिल। आणि सर्व काळजी घेऊनच करोना नावाचा मित्र घट्टमिठी मारणार असेल तर त्यातून ना इंग्लड चा प्रिन्स सुटला ना आपल्या देशाचा महानायक। आम्हाला ही आमचा जिव प्रिय आहे। आवश्यक नसेल तर नाही घरा बाहेर पडणार ।पण नाक्यावर पोलिसांचे दंडुके खायची आता इच्छा राहिली नाही। बाहेर पडणारा प्रत्येक जण अतिरेकी असल्या सारख्या त्यांच्या नजरा आता नकोशा वाटू लागल्या आहेत। ते तरी बिचारे काय करतील। आदेश पाळण्या शिवाय त्यांच्या पुढे पर्याय उरला नाही। पहिल्या दिवसा पासून पोलीस डॉक्टर नर्स साफ़ सफाई कामगार जतायेत ना कामावर येतायेत ना सुखरूप परत। काही शहीद होत आहेत। ते मनस्वी दुःख आहे पण मुंबई च्या दंगली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्लात किती शहीद झाले? । त्यांनाही माहीत नव्हतं घराबाहेर पडलेले ते येतील का परत? इथे तर माहीत आहे काळजी घेतली तर नक्कीच येऊ परत नाहीतर मरू। मग आम्ही पण येऊ सुखरूप घरी। महाराष्ट्रच्या माऊलीला भेटायला तुम्ही सहकुटुंब गेलात। एकाच शहरात, एकाच उपनगरात एकाच विभागात असलेल्या आमच्या वयोवृद्ध आईला आमच्या माऊलीला सोसायटी नियमामुळे भेटता येत नसेल तर मुलगा म्हणून ह्या जगण्याला अर्थ काय? राज्याच्या कानाकोपऱ्यातील आई वडिलाना या जाचक अटीमुळे भेटता येत नाही। असं चित्र आहे।पहिल्या लॉक डाऊन मध्ये तर आईचे अंतसंस्कार मोबाईल वर पाहण्याची वेळ मुलांवर आली ।हे किती क्लेशदायक आहे।माय बाप सरकार हो। एक सूचना आहे। एकाच वेळी रस्त्यावर प्रचंड गर्दी नको हवी असेल तर सम आणि विषम जल्मतारीख असणाऱ्याना मुभा द्या। म्हणजे एकाच वेळी देशाची अर्धी लोकसंख्या बाहेर पडेल आणि अर्धी घरी बसतील। पण आता बाहेर सोडा। घरात बसून श्वास गुदमरू लागला आहे।।यातून सहनशीलतेचा उद्रेक होण्याची वेळ आली आहे। आम्हाला वेटोळे घालून बसलेला लॉक डाऊन नावाचा अजगर आता हटवा बस्स। धारावी तील करोना नियंत्रणात येतो आणि राज्यातील इतर भागातील येत नाही हे काय गौडबंगाल आहे काही कळत नाही। याचा अर्थ इतर ठिकाणी दुर्लक्ष होतंय। हे स्पष्ट आहे। धन्यवाद
विकास महाडिक, पत्रकार
Be First to Comment