Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद

कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्यास रायगडात राजकीय बदल निश्चित : सुनील तटकरे यांचा दावा ! 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷

महाराष्ट्राच्या राजकारणात महाआघाडी स्थापन करून स्थानिक पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष एकत्र येऊन सत्तेत बसले . शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – राष्ट्रीय काँग्रेस – हे तीन पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थापन झाली , तर रायगडात त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष ही सोबतीला होता . हे चार पक्षांचे विचार वेगवेगळे असूनही भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जमवून घेतले . मात्र स्थानिक पातळीवर तालुकावार प्रमुख नेत्यांचे मनोमिलन होत नसल्याने स्थानिक राजकारणात कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी होता येत नसल्याने हीच का ती ” महाआघाडी ” असा उपहासात्मक सवाल सत्ताधारी कार्यकर्ते करताना दिसत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांत होणारी घुसमट व होणाऱ्या दबक्या आवाजातील चर्चेचा सूर पत्रकारांनी कर्जतमध्ये खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याशिवाय राजकीय बदल अशक्य , असे मत त्यांनी व्यक्त केले . मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात येथील नेत्यांचे मनोमिलन शक्य नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना सत्तेची फळ खाता येत नसल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहेत .

कर्जत – खालापूर मतदार संघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कट्टर विरोधी पक्ष आहेत . याचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना सन १९९९ साली झाली तेंव्हापासून पहाण्यास मिळत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळी सुरेशभाऊ लाड या चेहऱ्याला तिकीट देऊन शिवसेनेचे आमदार देवेंद्र साटम यांना पराभव पत्करावा लागला होता . तर २००४ साली देवेंद्र साटम यांनी राष्ट्रवादीचे सुरेशभाऊ लाड यांचा पराभव केला होता , तर पुन्हा सुरेशभाऊ लाड यांनी २००९ साली देवेंद्र साटम यांचा पराभव केला. तर २०१४ साली पुन्हा एकदा सुरेश भाऊ लाड विजयी होऊन शिवसेनेचे हनुमंत पिंगळे हे पराभूत झाले होते , हा कट्टर विरोधाचा “सिलसिला “सन २०१९ मध्येही दिसला, यावेळी शिवसेनेचे महेंद्रशेट थोरवे हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादीचे सुरेश भाऊ लाड यांचा पराभव केला . त्यामुळे या मतदार संघात या दोन कट्टर विरोधी पक्षातील या नेत्यांचे मनोमिलन अशक्य आहे.

यांचे मनोमिलन शक्य होणार का ?

यामुळेच वरिष्ठ पातळीवर झालेल्या महाआघाडीची सत्तेची फळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या नशिबी दिसत नाहीत .
कर्जत – खालापूर मतदार संघात कर्जत , माथेरान , खोपोली , व खालापूर या चार नगरपरिषद आहेत. यात कर्जत – माथेरानमध्ये शिवसेनेची सत्ता आहे , तर खोपोलीत राष्ट्रवादीची व खालापूरमध्ये शेकापचा नगराध्यक्ष आहे . कर्जत व खालापूर या दोन्ही पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे . या सर्व ठिकाणी महाआघाडीची सूत्रे पाळल्यास राजकीय उलथापालथ होऊ शकते . व महाआघाडीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना सत्तेची ” गोड ” फळे चाखता येतील , मात्र कर्जतमध्ये एकमेकांना पाण्यात पहाणारे पक्षाचे प्रमुख शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्रशेट थोरवे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांचे मनोमिलन अशक्य असल्याने कार्यकर्त्यांना सध्यातरी ही गाजराची पुंगी , कधीच न वाजणारी दिसत असल्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांचे वक्तव्य सध्यातरी अधांतरीत दिसत आहे .

मात्र वरिष्ठ पातळीवर सत्तेची फळे खाणारे नेत्यांनी , ठरवले तर बरेच काही होऊ शकते , अशी कुजबुज कार्यकर्ते करत असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे .मात्र यामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे विकास कामांत बाधा येत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.