शेतकरी चिंतामण पवार यांचा पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
बिल्डर पागुर योगेश देसाई याने तहसील कार्यालयात शेतकरी चिंतामण शंकर पवार यांच्या नावाने १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शेतकरी व प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचा आरोप शेतकरी चिंतामण पवार व कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी योग्य तो न्याय मिळावा तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी शेतकरी चिंतामण पवार यांनी शांततेच्या व संविधानिक मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. सोमवार दि.१९ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाच्या समोर ते आमरण उपोषण करणार असून त्यांच्या आंदोलनाला आता विविध स्थरातून पाठिंबा मिळताना दिसतोय. सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांची बडे बडे उद्योजक, भांडवलदार व विकासक यांच्याकडून सातत्याने फसवणूक होत असल्याची आजवर अनेक प्रकरणे समोर आली आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सर्व स्थरातून जोर धरत आहे.
शेतकरी चिंतामण पवार यांच्या तलाठी सजा दहिगाव हद्दीमधील आवंढे येथील सर्वे नं १०४ व १०६/१ या २२ गुंठे जागेत विकासक पागुर देसाई याने अतिक्रमण केले असून तसे अतिक्रमनाचे लेखी पत्र सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे. याबाबत बिल्डर पागुर देसाई विरोधात शेतकरी चिंतामण पवार यांनी दि.२८ नोव्हेंबर २०१८ रोजी पासून चार दिवसाचे अमरण उपोषण केले होते.यात शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी बिल्डर पागुर देसाई याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) ऍक्ट अंतर्गत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला.परंतु बिल्डर पागुर देसाई आपल्याला अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता जिल्हा व उच्च न्यायालयात गेले. परंतु त्यांस जामीन मिळाला नाही. त्यानंतर पुढे ते दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गेले असून त्याचे पुढे काय झाले या विषयी शेतकरी अजूनही अनभिज्ञच आहे.
बिल्डर पागुर देसाई याने शेतकरी चिंतामण पवार यांच्या सर्वे नं १०४ ची जागा हडप करण्याकरिता सन २०१० मध्ये तहसील कार्यालयात शेतकरी यांच्या नावाने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले.यात शेतकरी व त्यांच्या बहिणींच्या खोट्या सह्या व अंगठ्याचे ठसे मारून बहिणींचे राहण्याचे ठिकाण व वयाची तफावत असल्याची खोटी माहिती नमूद केली आहे.
प्रतिज्ञापत्रकारिता वापरण्यात आलेला १०० रुपयाचा स्टॅम्प पॆपर हा मुदत बाह्य असून प्रतिज्ञापत्र शेतकरी यांच्या नावाने केले असेल तर बिल्डर पागुर देसाई यांच्या नावाने स्टॅम्प पेपर खरेदी केले गेले आहे.जर प्रतिज्ञापत्र मुदत बाह्य असताना तहसील कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्र कसे बनविले गेले? त्याचप्रमाणे माणगाव प्रांत कार्यालयात खोटा जबाब देखील घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या विना सही व तारखेचे तहसील कार्यालय मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची अट शिथिल करून महसूल आकरणीच्या ४० पट नजराना शासनाजमा करण्याबाबत चे खोटे पेपर बनविण्यात आले आहे. या आपल्या फसवणुकीबाबत अनेकदा शासनाच्या निदर्शनास हि बाब आणून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. न्याय मागण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून शेतकरी चिंतामण पवार यांनी दि.१९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वां आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्याला न्याय मिळवून देईल का अशी आशा शेतकरी यांच्याकडून व्यक्त होत आहे. तालुका प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.







Be First to Comment