Press "Enter" to skip to content

रायगडात ओला दुष्काळ जाहीर करण्याची जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्रची मागणी

मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अजय शिवकर । 🔶🔷🔶

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. निसर्गाने केलेल्या अवकृपेने शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्रने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष रुपेश पाटील, कार्याध्यक्ष पंकज ठाकूर यांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. शिवाय उरणचे नायब तहसीलदार संदीप खोमणे यांची भेट घेत चर्चा केली तसेच निवेदन दिले.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेलं भातपिकाची वाताहात झालेली पाहून शेतकरी निराश झाला आहे. एकतर भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न निघत नाही. जवळपास तोट्याची शेती होत असताना शेतीवर जीवापाड प्रेम करणारा शेतकरी आपली जमीन ओसाड न ठेवता कसत असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत करत आर्थिक भार सोसत प्रसंगी उसनवारी करत शेती करत असतो. अशात निसर्गाने अवकृपा करून भातशेतीची नासाडी केल्यावर करायचं काय असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकतो.

शासनाने या भातशेतीचे पंचनामे करण्याचे यापूर्वीच आदेश दिले होते. त्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली होती. पावसापाण्यात उरलं सुरलं शेत आवरताना अर्ज दाखल करण्याबाबत पुरेशी माहिती नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न होणे या कारणास्तव अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान होऊन नये म्हणून अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून द्यावी अशीही मागणी जिव्हाळा फाऊंडेशन चे अध्यक्ष रूपेश पाटील, पंकज ठाकुर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.