अन्यथा मनसे स्टाईल वापरण्यात येईल : कर्जतमध्ये मनसेचा ईशारा ! 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔷🔶
कर्जत तालुक्यातील सर्वच बचत गट व मायक्रोफायनांस कंपन्या महिलांना तसेच नागरिकांना जबरदस्तीने व अत्यंत वाईट शब्दात दमदाटी करून वसुलीसाठी घरात घुसतात त्यांच्या या दंडेलशाही – मुजोर कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्जत तहसिल कार्यालयावर धडक देत विशाल मोर्चाचे आयोजन केले , मात्र कोरोना महामारीचा काळ असल्याने फक्त पदाधिकारी यांनीच जाऊन नायब तहसिलदार संजय भालेराव यांना निवेदन सादर केले . यावेळी तालुक्यातुन अनेक महिला उपस्थित झाल्या होत्या .
सध्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत सर्वच मानसिक – शारीरिक – आर्थिक त्रासामुळे मेटाकुटीस आले असताना या परिस्थितीचे भान न ठेवता व शासनाच्या कर्ज वसुली करू नये , ती वसूल करताना जोर जबरदस्ती करू नये , या आदेशाला केराची टोपली दाखवीत बचत गट व मायक्रोफायनांस कंपन्या अतिरेक करत आहेत . ग्रामीण तसेच शहरी भागातील बरेचसे नागरिक रेल्वे मार्ग बंद असल्याने बेरोजगार आहेत . अशा परिस्थितीत घर खर्च चालविणे कठीण झाले असताना या मायक्रोफायनांस कंपन्या वसुलीसाठी प्रत्येक गावात त्यांचे कर्मचारी पाठवीत आहेत . हे कर्मचारी उद्धट भाषा वापरून महिलांना दमदाटी करत असताना भांडणाचे स्वरूप येऊन कायदा – सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत .
याबाबत अनेक तक्रारी मनसे कडे आल्याने कर्जत तालुक्यात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दंडेलशाहीचा जाब शासन दरबारी विचारण्यासाठी कर्जत तहसिल कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन केले होते . यावेळी तालुका व शहरातील पदाधिकारी यांनी धडक देऊन शासनाला याचा जाब निवेदनामार्फत विचारला .

वरील सर्व परिस्थितीचा शासन दरबारी जाणीव असताना मायक्रोफायनांस कंपन्यांना व बचत गटास कर्ज माफीचा आदेश द्यावा , जेणेकरून सर्व महिला बचत गटातील महिलांचं कर्ज माफ होईल , व त्यांना दिलासा मिळेल या मायक्रोफायनांस कंपन्यांना रोक लावा अन्यथा मनसे स्टाईलने आम्ही त्यांना रोक लावू , असा इशारा मनसेचे कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण यांनी सडेतोड मत व्यक्त केले .
यावेळी हा धडक मोर्चा मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय दुर्गे
नगरसेवक, कर्जत नगरपरिषद , समीर चव्हाण – कर्जत शहर अध्यक्ष,चिन्मय बडेकर – शहर सचिव , रांकित शर्मा- शहर उपाध्यक्ष,मितेश महापुरे- शहर उपाध्यक्ष,राजेश साळुंके -शहर उपाध्यक्ष,
ओमकार मोरे -शहर उपाध्यक्ष,प्रज्योत घोसाळकर -शहर उपाध्यक्ष,त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .
सदर धडक मोर्चाला नारी शक्ती कर्जत यांनी पाठींबा दिला होता . स्वीटी बार्शी , ज्योती जाधव व इतर नारी शक्तीच्या महिला उपस्थित होत्या . यावेळी कर्जत पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवला होता .







Be First to Comment