सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )
जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोना महामारीने भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या आजीबाईच्या बटव्याला मात्र अच्छे दिन आणले आहेत. या आजाराच्या भीतीने आता घरोघरी काढे करा जुन्या आयुर्वेदिक झाड पाल्यांची औषधे करा, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांचा सूप करून प्या असे घरगुती उपायांना मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मानाचे पण मिळू लागले आहे. एरव्ही अडगळीत असलेली तुळस आता भलताच भाव खाऊ लागली आहे तर काळी मिरी , दालचिनी , सुंठ ज्यांची नव्या पिढीला फारशी ओळखही नव्हती त्या पदार्थांचे काढे घरच्या घरी केले जात असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मालेगाव काढा म्हणून परिचय पावलेला काढा तर पूर्वीच्या काळी साथरोगात हमखास वापरला जात असे अशी माहिती बुजुर्ग देत असल्याने तो काही वेगळा कोणताही काढा नसून वैद्यकीय क्षेत्र फारसे प्रगत नसताना त्या काळात येणाऱ्या साथ रोगांमध्ये घरच्या घरी असेच इलाज केले जात होते अशी बुजुर्गांची माहिती आहे. नव्या जमान्यासह जुने उपाय गेले काही दिवस खुंटीला टांगून ठेवण्यात आले होते त्यांना आता स्वयंपाक घरात आदराचे स्थान मिळू लागले असल्याचे कोरोना महामारीच्या निमित्ताने समोर येत आहे.
पुर्वीच्या काळी ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर त्या काळी गावोगावी डॉक्टर वैगरे नव्हते आणि शहरात जायला वाहतुकीची साधने आणि दळणवळणंही फारसे नव्हते अशावेळी घरातील वयस्कर मंडळी विशेषतः आपली आज्जी आपल्याला काही काढे करून द्यायची त्या सरशी अगदी फणफणलेला ताप, सर्दी , खोकला अगदी भुर्रकन निघून जायचा ! त्या काळात ना कुठे व्हेन्टिलेटरची व्यवस्था होती ना ही ऑक्सिजन मास्कची मुबलकता होती. मात्र आज्जीने केलेले घरगुती उपाय सरस ठरत होते. अगदीच काही नाही तर ओव्याची धुरी , मिठाच्या गरम पाण्यातून घ्यायच्या गुळण्या , कफ झाला असल्यास लसूणच्या पाकळ्यांची गळ्यात घातली जाणारी माळा, नेहमीच्या खाण्यात मुखशुद्धी म्हणून होणारा ओव्याचा वापर असे अनेक घरगुती उपाय केले जात असत. त्यातूनच मुळात आजारी पडण्याची संख्याच अतिशय कमी होती. त्यातूनही कुणी आजारी पडलेच तर बहुतांशी रुग्ण घरगुती औषधांनीच बरे होत होते. सध्या जगभर कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या आजारावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करीत आहेत मात्र अजूनही कोणालाही शंभर टक्के यश आलेले आज तरी दिसत नाही. या सर्व पार्शवभूमीवर जुन्या काळात हमखास केले जाणारे काढे वैगरेंना सध्या भलतीच मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. आजार झाल्यावर उपाय किंवा धावाधाव करण्यापेक्षा आजार आपल्याला होऊच नये यासाठी खबरदारी घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच आजीबाईंच्या बटव्याला आता अच्छे दीना आल्याचे दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात नव्या पिढीला एखाद्या दिवशी काढा वैगरे पियाला दिल्यास नाक मुरडणारी नवी पिढी आता स्वतःच घरच्यांना काढा बनविण्याचा आग्रह धरीत असल्याचे दिसून येत आहे. पुर्वीच्या काळी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक झाडपाल्याच्या साली , मुळ , पाने आदींचा वापर अशा काढयांतून होऊ लागला आहे. यामध्ये गुळवेलचा, कडू चिरायताचा, गुड्डूचा काढे आता होऊ लागले आहेत. हे सर्व काढे नवी पिढी सुद्धा किमान कोरोना माहामारीच्या भीतीने का होईना पिऊ लागली असल्यानेमागील काही वर्षे अडगळीत पडलेल्या आजीबाईंच्या बटव्याला मात्र कोरोनाच्या साथीत अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.
काय असायचे पूर्वीच्या काळी आजीबाईंच्या बटव्यात
काविळीवर अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या काढ्यासाठी उपयोगी असणारी गुळवेल , कडू चिरायता , गुड्डूची , अश्वगंधा , सागर गोटा , वेखंड , कुडा , जायफळ , डिकेमाळी , हिरडा (आई ) आवळा , तुळस आदी प्रकारच्या वनस्पती चा वापर करून पूर्वीच्या काळी आजीबाई आपल्या घरच्यांना आजारापासून दूर ठेवत होत्या.
काय काय असायचे आजीबाईंच्या बटव्यात ???
सागरगोटा, मुरुडशेंग, मायफळ, कुडामुळ,वेखंड, डिकेमाली,हिरडा, बाळ हिरडा, अतिविष,हळकुंड, बेहडा, पिंपळी,सुंठ, नागरमोथा, जायफळ, काकडशिंगी, जेष्ठमध,अश्वगंधा,खारिक, बदाम, वावडिंग अशा अनेक वनस्पती आजीबाईच्या बटव्यात होत्या. या वनस्पती पोटदुखी, ताप, कफ, अशक्तपणा, हगवण, कृमी,त्वचाविकार यावर उपयुक्त आहेत. ग्रामीण भागात गुळवेळ व कडेकिराईत चा ही वापर या बटव्या असायचा.काडेकिराईत तापावर उत्तम औषध आहे. कोणत्याही प्रकारचा ताप या वनस्पतीने बरा होतो. गुळवेळीस संस्कृत मध्ये अमृता म्हणतात.गुळवेल खरोखरच अमृता सारखी गुणकारी आहे. ही वनस्पती म्हणजे युनिव्हर्सल टॉनिक आहे. ताप, यकृत रोग,कावीळ, त्वचारोग, संधीवात, धातुक्षय, अर्श, उदर विकार ,नेत्रविकार,प्रदर, खोकला आदीवर ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे.






Be First to Comment