Press "Enter" to skip to content

पालीत आदिवासी बांधवांना पोलिसांनी दिले समाजहित व व्यसनमुक्तीचे धडे

शासन योजनांच्या लाभातील रोजगारनिर्मितीद्वारे आदिवासी स्थलांतर रोखणे शक्य :-  सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. डोंगर दर्याखोऱ्यात , माळरान पठारावर, दुर्गम व जंगल भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. रोजगाराच्या अभावाने आदिवासी कातकरी समाज बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतर करताना दिसतात. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी राज्य व केंद्र शासनाच्या असंख्य योजना आहेत.शासन योजनांच्या लाभातील रोजगारनिर्मितीद्वारे आदिवासी स्थलांतर रोखणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन पाली पोलीस स्थानकाचे  सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केले.

पालीतील आदिवासी समाज भवन येथे आदिवासी समाज बांधवांना विविध विषयांवर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आदिवासी वाड्यापाड्यात आदिवासी कातकरी बांधव दरवर्षी   नवरात्रोत्सव  उत्साहात व विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे श्रद्धा व  मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात, मात्र यावर्षी सर्वत्र कोरोना साथरोगाचे संकट असल्याने नवरात्रोत्सव सामाजिक भान राखत शासन नियमांचे पालन करून  साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थित  साजरा करावा, मूर्ती लहान ठेवावी अशा महत्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन अजित साबळे यांनी केले.

विशेष  म्हणजे आदिवासी समाजात लोकशिक्षणाची चळवळ अधिकाधिक वृद्धिंगत करणे, तसेच  व्यसनमुक्त समाज घडविणे याकरिता आवश्यक ते मार्गदर्शन देखील साबळे यांनी केले. आदिवासी समाज हा शांतता प्रिय व कष्टाळू समाज आहे, शासनाचे सर्व नियम व अटी शर्तीचे पालन करून संविधानिक मूल्यांची जोपासना करीत  जीवन जगण्यात धन्यता मानतो, प्रशासनाला आमचे यापुढेही सहकार्य असेल अशी ग्वाही आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी दिली. तर सुधागड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देणेसंदर्भात प्रशासनाने पुढाकार घेतल्यास अनेक कुटुंबांची प्रगती साधेल, तरुणांना योग्य दिशा मिळेल असे रमेश पवार यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी बांधवानी उपस्तीत केलेल्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले. या बैठकीस सुधागड तालुका आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, अखिल भारतीय कोकण विकास परिषदेचे संघटक रमेश पवार, कृष्णा वाघमारे, विष्णू वाघमारे, दगडू वाघमारे, संतोष वाघमारे, सागर वाघमारे आदींसह तरुण, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.