Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा शेतकरी संघटना घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

निसर्गाचा प्रकोप सोसेना,  हातातोंडाशी आलेला घास पडला गळून, महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना  भरपाईची अपेक्षा 🔶🔷🔶

अवकाळी पावसाचा भातपिकाला फटका, शासनाने नुकसानभरपाई द्यावी, आस्मानी संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 💠🌟💠

परतीच्या व अवकाळी पावसाचा मोठा फटका पाली सुधागड, शिहू बेणसे विभागासह संपूर्ण जिल्ह्यांतील शेतकऱ्याला बसला आहे. ऐन कापणीच्या हंगामात  पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. बहरलेली पिके डोळ्यादेखत चिखलात आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे. अशातच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी मात्र पूर्णतः हतबल व हताश झाला आहे.

निसर्गाचा प्रकोप जगू देत नाही, मायबाप सरकारने आम्हा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे साकडे नुकसानग्रस्त शेतकरी घालत आहे. शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी व शासनाने नुकसानीची योग्य ती भरपाई द्यावी यासाठी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरीचंद्र  शिंदे  यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

अतिवृष्टीने व परतीच्या पावसाने उभे पिक शेतात आडवे झाले. तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी येथील शेतकर्‍यांच्या हातोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातूर व व्याकुळ झाला आहे. सततच्या अतिवृष्टीने भाताच्या फुलावर पाउस पडल्याने फुले झडून गेली. भाताच्या लोंबीत दाणा तयार झाला नाही. त्यानंतर जो भात निसावला गेला त्या भात पिकावर सतत अतिवृष्टी झाल्याने भात जमिनदोस्त होवून भाताच्या लोंब्यांना अंकूर फुटले. त्यामुळे शेतकरी नुकसानीच्या या धक्क्यातून अद्यापही सावरला नाही.

अवकाळी व परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी आता खुप मोठ्या नैसर्गीक व मानवनिर्मित संकटात सापडला आहे. शेती व्यवसाय आता आव्हानात्मक व्यवसाय ठरत आहे. मागील तीन वर्षांत येथील भातशेतीचे प्रमाण तब्बल तीस टक्यांनी घटले आहे. पावसाचा अनियमितपणा, सातत्याने होणारे हवामान बदल व नैसर्गीक आपत्ती, तुकड्यांमध्ये विभागलेली शेती, वाढते औद्योगिकिकरण व वसाहतीकरण आणि उत्पादनापेक्षा उत्पादनखर्च अधिक या सर्व अडचणींमध्ये येथील बळीराजा अडकला आहे.  त्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तुटपुंजी मदत यामुळे येथील शेतकरी आता शेतीपासून दूर होत चाललेला दिसत आहे.

यामुळे शेतकर्‍याला सरकारने आधार देणे गरजेचे आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्याची मुख्य ओळख असलेला कृषीव्यवसाय येत्या काळात धोक्यात येण्याची भीती आहे. शासनाकडून याची लवकर नोंद घेणे आवश्यक आहे. शासनाने संकटकाळी व नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व मदतीचा हात देऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला तरच कुठे शेती व्यवसाय तरु शकेल अन्यथा येथील बळीराजा शेतीपासून कायमचा दूर जाईल हे निश्चित !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.