पेणमधील बौद्ध कालीन लेण्यांना संरक्षित स्मारक तयार करा 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
मागील 12 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गड किल्ल्यांचे संवर्धन आणि संशोधन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या पेण मधील मावळ्यांनी पेण तालुक्यातील वाकरुळ गावापासून जवळच असणाऱ्या खरबाच्या वाडीजवळ तीन लेण्या शोधण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्यातील या एकमेव अशा लेण्या आहेत की त्या सहा महिने पाण्याखाली असतात. सह्याद्री प्रतिष्ठानने या लेण्यांचा शोध लावून याची पाहणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून व्हावी आणि त्याचे जतन होऊन या लेण्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात याव्यात अशी मागणी भारतीय पुरातत्व खात्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाकरुळ गावाजवळ असलेल्या खरबाची वाडी येथे या तीन लेण्या असून आठ बाय आठ,बारा बाय बारा आणि आठ बाय आठ अशा लांबी रुंदीच्या या लेण्या असून त्यात प्रत्येकी दोन स्तंभ म्हणजेच खांब आहेत. या लेण्यांच्या कोरीव कामावरून त्या बौद्ध काळात कोरल्या गेल्या असल्याचे समजते. सदर लेण्यांच्या ठिकाणी संरक्षित स्मारक झाल्यास पेण तालुक्यातील पर्यटनात वाढ होऊन तालुक्याला महसूल उत्पन्न स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या लेण्यांची पाहणी सह्याद्री प्रतिष्ठान कडून झाली असता या लेण्यांकडे हेटवणे धरणाचे पात्र असल्याने धरणाची पातळी ऑगस्ट ते डिसेंम्बर मध्ये वाढलेली असल्याने त्या पाण्याखाली असतात तर जानेवारी ते जुलै महिन्यात पातळी कमी असल्याने त्या आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळे सध्याच्या भौगोलिक परिस्थिती चा विचार करता रायगड जिल्ह्यातील या अशा एकमेव लेणी आहेत की त्या सहा महिने पाण्याखाली असतात.
या लेण्यांचा हा सर्व लेखाजोखा पाहता भारतीय पुरातत्व खात्याने सुद्धा पाहणी करावी आणि त्यांचे जतन करून या लेण्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात याव्यात अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान पेणच्या वतीने करण्यात आली आहे.







Be First to Comment