हनुवटीवरच फुल, कपाळावरचं गोंदण
ठिपक्यांची रांगोळी, सारवलेलं आंगण
लुकलुकत्या नजरेआड, संसाराचं गुपित
काळाच्या वनवासातली, सीता ती शापित
हजारभर सुरकुत्या, मऊशार कातडीवर
कठोर जीव तोलून धरलाय, थरथरत्या काठीवर
प्रत्येक श्वास, रुतून बसलाय दगडाच्या भिंतींत
फुटलेल्या कौलांवरनं, भेगाळलेल्या मातीत
माया पेरून, सरींमध्ये मोठं केलंय संसारझाड
संस्कारांचं कुंपण करून, डोळे पुसत पदराआड
लेकरांच्या संसारावर किरपा कर आई
खणा नारळांनं ओटी भरीन शबूद ती देई
माजघरातले दिवे लावून, शोधत गोठ्यात वासरू गाय
पाठीवरण हात फिरवत उभी राही, माझी माय माझी बाय !
विनायक पाटील , डोंबिवली






Be First to Comment