कृषी विधेयक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखाडातून बाहेर काढेल : अनिल बोंडे 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶
‘कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी चांगले असून हे विधेयक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न समित्यांच्या जोखाडातून बाहेर काढेल. विरोधक या विधेयकाला विरोध करीत आहेत तसेच शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. खरे तर काँग्रेसच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास आम्ही शेतकरी करार करण्याचे जाहिर करण्यात आले आहे परंतु ते आता शब्द फिरवीत आहेत. या विधेयकाने शेतकरी आपला शेतीचा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये न देता शेताच्या बांधावर किंवा स्वतःच्या दुकानात विकू शकतो. त्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे.’ असा विश्वास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी सुधीर दिवे, ललित समदूरकर, कोंकण समन्वयक सुनील गोगटे, अशोक गायकर, परशुराम म्हसे, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, हृषीकेश जोशी, नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखा जिनगरे, किरण ठाकरे आदी उपस्थित होते.
सुनील गोगटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून पत्रकार परिषदेचा उद्देश सांगितला. सुधीर दिवे यांनी, ‘पाच हजार तालुक्यात पाचशे शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्यांना तीन वर्षांसाठी तीस लाख रुपये देण्यात येणार असून पाच वर्षे हा समूह चालवायचा आहे. त्यासाठी चांगला निधी केंद्र सरकारने जाहीर केला आहे.’ असे स्पष्ट केले.
बोंडे यांनी पत्रकारांशी दिलखुलासपणे वार्तालाप करताना, ‘शिवसेना आमच्या बरोबर होती तेंव्हा बरी होती मात्र आता ती काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर गेल्याने त्यांचा गुण त्यांना लागला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या जातील, आधारभूत किंमत मिळणार नाही असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. 1971 साली मिलो खाऊन दिवस काढावे लागले होते. त्यांनतर आपल्या देशातील शेतीचे उत्पादन वाढले. कोरोना महामारीत उद्योग धंदे, व्यवसाय ठप्प झाले मात्र बळीराजाने आपल्याला या काळात जगविले आहे. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहे.
यापूर्वी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत होते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. कृषी विधेयकाला विरोधासाठी विरोध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी शेताच्या बांधावर गेले असता शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या त्या ते ‘गझनी’ सारखे विसरले आहेत. शरद पवारांनी सुद्धा आपल्या आत्मचरित्रा मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शेतकऱ्यांना मुक्त करा असे लिहिले आहे. ते सुद्धा ते विसरले आहेत.’ अशी आठवण त्यांनी करून दिली.
पत्रकार परिषदेपूर्वी अनिल बोंडे यांनी अशोक गायकर यांच्या श्रीकृष्ण गोशाळेला भेट दिली व तेथे शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनतर मालवाडी रस्त्यावर असलेल्या राजन काळे यांच्या ऑर्किड फुलांच्या पोलो हाऊसला भेट देऊन त्याबाबतच्या समस्या जाणून घेतल्या.








Be First to Comment