जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सरपंच गणेश बाळके यांचे सरपंच पद झाले होते रद्द 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले होते. या रिक्त जागेवर उप सरपंच विजय मराठे यांची प्रभारी सरपंच म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सुधागड गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी यासंदर्भातील पत्र पाली ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले.
पाली ग्रामपंचायत ही सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी व मुख्यालयाच्या ठिकाणी असलेलेली ग्रामपंचायत आहे. सप्टेंबर 2018 मध्ये गणेश विश्वनाथ बालके हे सरपंच पदासाठी सार्वत्रिक निवडणूक राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र त्यांनी निवडून आलेल्या दिनांका पासून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी गुरुवारी (दि.1) आदेश काढून त्यांचे सरपंच पद रद्द केले होते. याबाबत पाली ग्रामपंचायत सदस्य भास्कर केशव दुर्गे व इतर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली होती.
प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 37 अन्वये तथा त्या अंतर्भूत पोट कलमान्वये सरपंच यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी सरपंच कामकाज पहावे असे आदेश पाली सुधागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी दिले आहेत.
मिळालेल्या जबाबदारीवर प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठतेने काम करेन. ग्रामस्थांचे प्रश्न सोडवून त्यांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न करेन.
विजय मराठे, प्रभारी सरपंच, पाली ग्रामपंचायत








Be First to Comment