Press "Enter" to skip to content

खासदार सुनिल तटकरेंना शेतकऱ्यांचे पुन्हा साकडे

पाली खोपोली राज्यमहामार्ग भूसंपादन बाधीत शेतकऱ्यांची  मोबदल्यासाठी वर्षानुवर्षे फरफट 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली-रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

वाकण पाली खोपोली राज्यमहामार्ग 548 ( ए) या 41 किलोमीटर मार्गाची रुंदीकरण प्रक्रिया वर्ष 2017 पासून सुरू झाली आहे. या रुंदीकरणा दरम्यान मार्गालगतचे नुकसानग्रस्त व बाधीत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा या मागणीकरीता अनेकदा आंदोलन, उपोषण , मोर्चे , रॅली, रास्ता रोको करण्यात आली.  या प्रश्नी खा.सुनिल तटकरे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती. मात्र अद्यापही बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून कोणताही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्ष मोठी फरफट झाली आहे. आज ना उद्या नुकसानभरपाई व मोबदला मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी खा.तटकरे यांना साकडे घातले आहे.  पुन्हा एकदा याप्रकरणी लक्ष देऊन नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना, स्थानिकांना योग्य व जलद  न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खा. तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान खा.सुनिल तटकरे पाली खोपोली मार्गावरील बाधीत  शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील असा विश्वास सुधागड तालुका शेतकरी समनव्य संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादन बाधीत शेतकऱ्यांना शासनाने जी आर 2013 या 24 (2)चा वापर करून बाधीत शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पाली खोपोली मार्गातील शेतकऱ्यांना मोबदला मिळणे गरजेचे आहे.

याकरिता बाधीत शेतकरी  खा.तटकरे यांची शनिवारी भेट घेऊन आपली मागणी व व्यथा मांडणार आहेत.  सुधागड तालुका शेतकरी समनव्य संघर्ष समितीने याप्रश्नी सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेत शासन प्रशासनाला संविधानिक मार्गाने जागे करण्याचे काम केले. मात्र निगरगट्ट व झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या हिताचे काही गांभीर्य नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले. 

यासंदर्भात खा. सुनिल तटकरे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने नागपूर व मुंबई अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून संयुक्त मोजणीची मागणी केली. तसेच खा.तटकरे यांनी सदर प्रश्नावर नितीन गडकरी  यांची भेट घेऊन योग्य ते सहकार्य करण्याची  विनंती केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

पाली खोपोली मार्गाची रुंदीकरणा दरम्यान झालेली प्रचंड दुरावस्था.

संयुक्त मोजणी झाल्यास भूसंपादन प्रक्रियेत वाढीव क्षेत्र किती जाते हे स्पष्ट होईल मात्र आजही या मागणीकडे महसूल प्रशासन   व  एम. एस. आर. डि. सी जाणीवपूर्वक दुर्लक्ष व दिरंगाई करीत असल्याचा आरोप शेतकरी समनव्य संघर्ष समितीने केला आहे. सन 1974 मध्ये झालेल्या भूसंपादन प्रक्रियेत काही खातेदारांना पेमेंट झालेच नाही अशा तक्रारी शेतकरी वर्गातून येत आहेत.

याबरोबरच अवार्ड व सी सी नाही, सातबारा अंमल नाही, राजपत्रात नाव नाही, अशा अनेक त्रुटी या प्रकरणात असताना आजही शेतकरी संबंधीत जमीन व घराचा टॅक्स व धारा भरत आहेत. सद्यस्थितीत ठेकेदार शरद शुक्ला या ठेकेदाराला सातत्याने काम करण्याच्या सूचना महाराष्ट्र्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम एस आर डी सी) प्रशासनाकडून दिल्या जात असूनही या मार्गाचे काम बंद पडलं आहे.

आज वाकण पाली  खोपोली मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून प्रवाशी, रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावरून प्रवास करताना धूळ, चिखल, दगड , गोटे व माती यामुळे प्रवाशी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे. प्रवाशी व पर्यटकांना मान, मणका, कंबरेचे दुखणे व दम्याचा त्रास जाणवत आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी देखील शेतकरी समनव्य संघर्ष समितीच्या वतीने प्रमोद मोरे यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.