सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील प्रलंबित असलेले वेतन त्वरित मिळावे व एसटी कामगारांना दर महा देय त्याच तारखेला पूर्ण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पेण एस टी विभागिय कार्यालय रामवाडी येथे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण आज शुक्रवार ता ९ रोजी करण्यात आले.
महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एस टी कामगारांचे प्रलंबीत ३ महिन्याचे वेतन ७ ऑक्टोंबर पर्यंत न मिळाल्यास विभागीय कार्यालया समोर संघटनेचे पदाधिकारी आत्मक्लेश उपोषण करतील असा पत्राद्वारे इशारा व्यवस्थापकीय संचालक व परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ यांना देण्यात आले होते. त्यानुसार ३ महिन्यातील जुलै महिन्याचे वेतन जमा झाले असले तरी प्रलंबित असलेले ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरित मिळावे आणि माहे मिळणारे वेतन देय तारखेलाच देण्यात यावे या प्रमुख मागणी साठी राज्यभर आत्मक्लेश उपोषण करण्यात येत असल्याचे यावेळी विभागीय अध्यक्ष विलास खोपडे यांनी सांगितले.
यावेळी विभागीय अध्यक्ष विलास खोपटे, सचिव गणेश शेलार ,केंद्रीय उपाध्यक्ष आशा घोलप, कार्याध्यक्ष दिपक शेडगे,संघटना सचिव तुलशिदास पाटील,चंद्रशेखर देव,बाळू बांगर,नकुल पाटील,सायली वाणी,श्रीकृष्ण भावे यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपोषणात सहभागी झाले होते.
लॉकडाऊनच्या काळात एस टी महामंडळाचे उत्पन्न घटले होते मात्र आता प्रवाशी वाहतूक सुरळीतपणे होत असल्याने एसटी कामगारांचे वेतन लवकरच अदा करण्यात येईल.
अनघा बारटक्के -- विभागीय अधिकारी








Be First to Comment