हातोंड गावची शौर्य कन्या स्नेहल वाघमारे हिला नरौत्तम शेखसरीया एक्सलन्स अवॉर्ड प्रदान.! 🔶🔷🔶
मुंबई पोलिस कमिशनर परमवीर सिंह यांच्या हस्ते सत्कार…! 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 💠🌟💠
सुधागड तालुक्यात सर्वगुणसंपन्न व गुणवत्ताधारक व्यक्तींची खान आहे. अशा तेजोमय व्यक्तिमत्वांमुळे सुधागडच्या शिरपेचात सातत्याने मानाचा तुरा खोवला जातो. सुधागड तालुक्यातील हातोंड गावची शौर्य कन्या स्नेहल राजेंद्र वाघमारे हिला नरौत्तम शेखसरीया एक्सलन्स अवॉर्ड व 50 हजार रोख बक्षीस मिळाले आहे. मुंबईचे पोलिस कमिशनर परमवीर सिंह यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.
पुरस्काराने प्रेरणा मिळते व प्रेरणेने राष्ट्र घडते. या सन्मानाने भविष्यात विविध क्षेत्रात जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सन्मानार्थी स्नेहलने सांगितले. या सन्मानाने सुधागड हातोंडसारख्या डोंगर दर्याखोऱ्यात , दुर्गम भागात वसलेल्या छोट्या गावाचे नाव स्नेहलच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. त्यामुळे स्नेहलवर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नरौत्तम शेखसरीया फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उच शिक्षण घेत असलेल्या पाल्यांची त्यांची शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक कामगिरी, सामाजिक योगदान आणि विशेष गुणात्मक दर्जा या संदर्भात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यात पहिल्या पाच मुलांची अंतिम निवड करण्यात आली. यामध्ये स्नेहल वाघमारे अव्वल ठरली आहे.
द्या एक मदतीचा हात उपक्रमाद्वारे अनेक गोर गरीब मुलांना शैक्षणिक साथ देणारे मुंबई पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागातील पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे हे स्नेहलचे वडील आहेत. त्यांचे मूळ गाव सुधागड तालुक्यातील हातोंड हे आहे. सुधागड व रायगड जिल्ह्यात ते त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचाच वारसा स्नेहल पुढे नेत आहे. प्रतिभासंपन्न स्नेहलच्या उतुंग कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्नेहल ची बालवयातील कामगिरी दैदिप्यमान व कौतुकास्पद अशीच आहे. स्नेहलने खोपोली येथे धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या एका प्रवाशाचे प्राण वाचविले होते. या साहसा बद्दल तिला बुद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने “शौर्य कन्या*” पुरस्कार देण्यात आला होता. तसेच नवोदय विद्यालयात विविध स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविल्याने ती गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जात होती. मी सावित्रीबाई फुले बोलतेय हा एक पात्री कार्यक्रम देखील ती करत आहे.








Be First to Comment