प्राथमिक शिक्षण अधिकारी शितल पुंड यांनी बजावल्या शाळांना नोटीसा 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
शासन निर्णय दिनांक २४ ऑगस्ट २०१० नुसार शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेली असताना पनवेलसह रायगड जिल्ह्यात शाळांनी सदर शासन निर्णयाची पायमल्ली केली असल्याची बाब प्रहार जनशक्ती पक्षाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यावर प्राथमिक शिक्षण अधिकारी शितल पुंड तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी रायगड मधील सर्व शाळांना १५ दिवसांची नोटीस बजावली आहे.
त्याचप्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये राज्यातील खाजगी आणि विना अनुदानित शाळेत २५% आरक्षित जागेवर गरीब व वंचित घटकातील मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो. परंतु जिल्ह्यातील अनेक खाजगी आणि विनाअनुदानित शाळा या प्रवेश दिलेल्या मुलांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, ११ ओक्टोंबर २०११ रोजी पारित केलेल्या अधिसूचना प्रमाणे कलम १२च्या पोट कलम (१) च्या खंड (ग) अनुसार बालकास मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य आणि गणवेश मिळण्यास ते हक्कदार असेल असे असतानाही शाळा प्रशासन मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश देत नसल्याच्या तक्रारी आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गवस यांनी शिक्षण अधिकारी शितल पुंड यांची रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय, अलिबाग येथे भेट घेतली व सदर बाब निवेदनाद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी शितल पुंड यांनी उप शिक्षण अधिकारी यांना बोलावून शाळांकडून अहवाल मागवण्यास सांगितले व शासनाचे नियम न पाळणाऱ्या शाळांना नोटीस पाठवून त्यांच्यावर वेळ आल्यास दंडात्मक व नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गवस, उपजिल्हा अध्यक्ष सचिन नाकते, कामगार संघटनेचे चंद्रकांत उत्तेकर, सुनील शिरिषकर, हर्षल मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment