Press "Enter" to skip to content

अॅमझॉनने फ्यूचर ग्रुपच्या प्रमोटर्सना पाठवली कायदेशीर नोटीस

अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि फ्यूचर ग्रुप यांच्यात झालेल्या करारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत सौदा करुन मागील वर्षी झालेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप अॅमेझॉनने केला आहे. यासंदर्भात अॅमझॉनने फ्यूचर ग्रुपच्या प्रमोटर्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

काय आहे प्रकरण?
मागील वर्षी अॅमेझॉनने फ्यूचर कुपन्समधील 49 टक्के भागीदारी 1500 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. तर अॅमेझॉनची फ्यूचर रिटेलमध्ये 7.3 टक्के भागीदारी आहे. अॅमेझॉनने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये आरोप केला आहे की, फ्यूचर ग्रुपने कराराचं उल्लंघन केलं आहे. आता हा वाद कोर्टात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अॅमेझॉनने फ्यूजर ग्रुपसोबत झालेल्या राईट ऑफ फर्स्ट रिफ्युझल आणि नॉन कम्पिट क्लॉझ अंतर्गत फ्यूचर कुपन्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली होती. अॅमेझॉनने कराराचा दाखला देत म्हटलं की, फ्यूचर ग्रुपच्या रिस्ट्रिक्टेड लिस्टमधील कंपन्या कोणत्याही करारात सहभाग घेऊ शकत नाहीत.

रिलायन्ससोबत 24713 कोटींचा करार
कर्जाचं वाढता डोंगर आणि दिवाळखोरीच्या प्रक्रियेपासून वाचण्यासाठी किशोर बियानी यांनी ऑगस्ट महिन्यात आपला रिटेल बिझनेस मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला विकला होता. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडरी कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) फ्यूचर ग्रुपसोबतच्या कराराची माहिती दिली होती. यानुसार कंपनी फ्यूचर ग्रुपच्या रिटेल अँड होलसेल बिझनेस आणि लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग बिझनेस संपादित करणार आहे. याद्वारे रिलायन्स फ्यूचर ग्रुपच्या बिग बाजार, EasyDay आणि FBB च्या 1,800 पेक्षा अधिक दुकानांपर्यंत पोहोचेल, जी देशातील 420 शहरांमध्ये आहेत. हा सौदा 24713 कोटी रुपयांमध्ये झाला होता.

या करारानंतर रिलायन्स रिटेल बिझनेसमध्ये अॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या फ्लिपकार्टला टक्कर देण्याच्या स्थितीत पोहोचली होती. भारताच्या रिटेल बिझनेसमध्ये रिलायन्स आणि अॅमेझॉनला जोरदार टक्कर देण्यासाठी अमेरिकेची कंपनी वॉलमार्टने टाटा ग्रुपच्या ई-कॉमर्स बिझनेससाठी लॉन्च होणाऱ्या सुपरअॅप प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या गुंतवणुकीसाठी वॉलमार्ट आणि टाटा ग्रुपमध्ये चर्चा सुरु आहे. टाटा ग्रुपच्या सुपरअॅप प्लॅटफॉर्ममध्ये वॉलमार्ट 25 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.