नागोठणे पोलिस ठाण्याची कार्यतत्परता 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
ऑनलाइन शाॅपिंग करण्याच्या नादात येथील एक व्यक्तीला ४० हजार रूपयांचा गंडा घालण्यात आला होता. मात्र नागोठणे पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संतोष म्हात्रे यांनी सायबेरियाचा सेलच्या मदतीने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे त्या संबधित व्यक्तीचे गेलेले ४० हजार रुपये त्याच्या खात्यात पुन्हा जमा झाले आहेत. यासाठी नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल साॅ कंपनीच्या वर्कर्स काॅलनी मध्ये राहणारे कर्मचारी राजकुमार शिवप्रसाद यादव (वय ४०) यांनी अमेझॉन या ऑनलाइन शाॅपिंग अॅप वरुन सहाशे रुपयांची एक साडी आठ दिवसांपूर्वी खरेदी केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही ही साडी आली नाही. त्यामुळे राजकुमार यांनी इंटरनेट वरुन अमेझॉनचा कस्टमर केअर क्रमांक मिळविला. मात्र हा क्रमांकच बनावट असल्याने या क्रमांकावर संपर्क झालेल्या तेथील व्यक्तीने तुमचा पत्ता चुकीचा असल्याने साडी पोचली नसल्याचे सांगितले. तसेच साडी येण्यासाठी तुम्ही ” अॅराॅन पे वाॅलेट ” हे अॅप मोबाईल मध्ये डाऊनलोड करा असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने राजकुमार यांना त्यांच्या क्रेडिट कार्ड मार्फत दहा रुपये अॅराॅन पे वाॅलेट वर पाठविण्यास सांगितले. याच दरम्यान त्या व्यक्तीने राजकुमार यांच्याकडून सर्व तपशील घेतला असल्याने त्याने दोन वेळा २० हजार अशी ४० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती. हा प्रकार रविवार दि. ४ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ वा. दरम्यान घडला होता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजकुमार यांनी रविवारीच दुपारी दोन वाजता नागोठणे पोलिस ठाणे गाठले. तेव्हा तेथे कार्यरत असलेले पो.हे.काॅ. संतोष म्हात्रे यांनी पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचे मुंबई नोडल आॅफिसर श्रिराम घोडगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची सर्व माहिती दिली. त्यानुसार श्रिराम घोडके यांनी त्यांच्या पद्धतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यानुसारच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फसवणूक झालेले ४० हजार रुपये राजकुमार यांच्या खात्यात पुन्हा करण्यास आरोपीस भाग पाडले. सदर गुन्ह्यात आरोपीचा तपास लागला नसला तरी ४० हजार ही रक्कम परत मिळवून देण्यास नागोठणे पोलिस व सायबर सेल विभागायला यश आले आहे. दरम्यान असे असले तरी ऑनलाइन व्यवहार करतांना आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जपूनच करावेत असे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
Be First to Comment