पनवेलमधील कोव्हिडयोद्ध्यांचा गौरव
सिटी बेल लाइव्ह / श्रीनिवास काजरेकर /पनवेल #
कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुवंदना’ हा ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाअंतर्गत पनवेल महापालिकेतील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यकामगार व नवी मुंबई झोन 2 उपयुक्तालयाचे पोलिस यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला दिलेल्या धैर्य, संयम आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती या शिकवणीबाबत या कर्मगुरूंना मानपत्र देवून गौरविण्यात आले. पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यानीही कार्यक्रमात सहभाग घेवून संस्कार भारतीच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. वैशिष्ट्य म्हणजे या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ देशापरदेशातील हजारो लोकांनी घेतला.
प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक यांचे ‘निसर्ग हाच गुरू’ या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. यामधे निसर्गाचे गुरुतत्व सांगताना ते म्हणाले, गुरू ही एक प्रवृत्ती असून नकळतपणे संस्कार करणारा निसर्ग हा आपला मोठा गुरू आहे. तो समर्पित असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा संदेश देतो. तो अनासक्त असून तादात्म्याची शिकवण देतो. तसेच संधी निर्माण करा व त्या संधीचे सोने करा असा महान संदेश देतो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पनवेल समिती अध्यक्ष वैजयंती बुवा यानी ध्येयगीत सादर केले. उपाध्यक्ष वकील अमित चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर रेखा बुवा रचित, नमिता बुवा यांनी गायलेल्या गाण्यावर निधी व आद्या दलाल यांनी नृत्यातून कर्मगुरूंच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर पूजा आंबवणे यानी रचलेला पोवाडा मच्छिन्द्र पाटील व सहकाऱ्यानी सादर केला. नेहा खरे यानी सुलेखित केलेल्या मानपत्राचे वाचन वकील जुईली चव्हाण यांनी केले. अपर्णा नाडगौडी यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. नेहा खरे यानी चित्रफीत संकलन व संपादन केले तर स्वाती इंदुलकर व सिद्धेश झारे यांनी तंत्रसहाय्य केले. मनोगत
“कोरोनानिर्मुलनासाठी प्रशासन अविरत प्रयत्न करत आहे. महापालिकेतील प्रत्येक घटक हा योद्धा आहे. अनेक कर्मचारी स्वतः कोरोनाग्रस्त असूनही ऑनलाईन पद्धतीने जबाबदारी पार पाडत आहेत. याबद्दल संस्कार भारतीसारख्या संस्थांनी त्यांची घेतलेली दखल मोलाची आहे. सर्व नागरिकानीही यासाठी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.” सुधाकर देशमुख,आयुक्त पनवेल मनपा.






Be First to Comment