सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷💠🔷
एचडीएफसी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका टोळीने पनवेलमध्ये रहाणार्या 28 वर्षीय तरुणाला तब्बल 3 लाख 96 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेल्या तरुणाचे नाव विक्रांत देवधर असे असून तो पनवेल भागात रहाण्यास आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या विक्रांतने नोकरी डॉट कॉमवर आपली माहिती भरली होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये एका महिलेने त्याला संपर्क साधुन त्याला एचडीएफसी बँकेत नोकरी मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर मनिष अगरवाल नामक व्यक्तीने विक्रांतला फोन करुन त्याची ऑनलाइन परिक्षा घेण्याच्या बहाण्याने त्याला प्रवेश फी 2 हजार रुपये, ट्रेनिंग फी 8 हजार रुपये तसेच व्हेरिफिकेशन फी 25 हजार रुपये अशी रक्कम भरण्यास भाग पाडले होते.
नोकरी मिळेल या आशेने विक्रांतने सदरची रक्कम भरल्यानंतर सदर टोळीने विक्रांतच्या ईमेलवर ऑफर लेटर, जॉयनिंग लेटर व एक वर्षाचा बाँड पाठवून देत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सदर टोळीने विक्रांतला एक वर्षाच्या बाँडसाठी 32 हजार 700 रुपये आणि लॅपटॉपसाठी 43 हजार 500 रुपये भरण्यास विक्रांतला भाग पाडले. त्यानंतर देखील सदर टोळीने जीएसटीची रक्कम भरावी लागेल असे सांगितल्याने विक्रांतने जीएसटीचे 34 हजार रुपये तसेच ड्रेसकोडसाठी 1 लाख 85 हजार रुपये सदर टोळीने सांगितल्यानुसार त्यांच्या बँक खात्यात पाठवून दिले.
त्यानंतर देखील समोरील व्यक्तींकडून वेगवेगळी कारणे सांगुन आणखी पैसे भरण्यास सांगण्यात येऊ लागल्यानंतर विक्रांतने आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. यावर सदर टोळीने त्याला आणखी 10 हजार रुपये भरल्यास त्याचे पैसे परत मिळतील असे सांगून त्याला आणखी 10 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर देखील त्याची रक्कम त्याला पाठविली नाही. त्यानंतर सदर टोळीकडून फसवणूक होत असल्याचे विक्रांतच्या लक्षात आल्यानंतर त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळीविरोधात फसवणूकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
Be First to Comment