गागोदे खिंडीत दरोडा प्रकरणातील 6 दरोडेखोर गजाआड 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔷🔶🔶
पेण-खोपोली मार्गावरील गागोदे खिंडीत ट्रकचालकासह तिघांचे अपहरण करुन 40 लाखांचा दरोडा टाकलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. या सहा दरोडेखोरांनी लुटलेल्या मालासहीत एक कारही जप्त करण्यात आली असून, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
14 सप्टेंबर रोजी फिर्यादी चंद्रकांत शिवराज गुंगे (वय 32, रा.बसवकल्याण जि. बिदर, राज्य-कर्नाटक) हे त्यांचे ताब्यातील चौदा टायर ट्रक (क्र. के.ए./56/3439) मध्ये नागोठणे येथील सुप्रिम कंपनीतून 25 लाख 74 हजार 288 रुपये किंमतीच्या प्लास्टिक दाण्याच्या गोण्या भरुन नागोठणे येथून चेन्नई येथे जाण्याकरिता मुंबई-गोवा महामार्गावरुन तरणखोप येथून पेण खोपोली बायपास मार्गाने खोपोलीकडे जात होते.
सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते गागोदे खिंड येथे आले असता, 7 ते 8 अज्ञात इसमांनी त्यांच्या ताब्यातील लाल रंगाच्या झायलो कारने ट्रकला ओव्हरटेक केले आणि कार ट्रकच्या पुढे आडवी उभी केली. ट्रक थांबवून जबरदस्तीने ट्रकमध्ये प्रवेश केला आणि ट्रकचालक चंद्रकांत गुंगे व त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली.
त्यानंतर त्यांना झायलो कारमध्ये कोंबले.
दोन ते तीन तास कारमध्ये फिरवल्यानंतर चंद्रकांत गुंगेंसह तिघांच्या डोळ्यावर कापडी पट्टी बांधून हातपाय बांधून मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ईरवाडी गावच्या पेट्रोलपंपापुढे गवतात त्यांना गाडीमधून फेकून देत प्लास्टीक दाण्याने भरलेला ट्रक, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 40 लाख 98 हजार 788 रुपये किंमतीचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला.
या घटनेनंतर चंद्रकांत गुंगे यांनी पेण पोलीस ठाण्यात धाव घेत, 15 जुलै रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली. याप्रकरण पेण पोलिसांत दरोडा, अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी 4 तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक ट्रक बेवारस स्थितीत आढळून आला.
हा ट्रक गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाल्यानंतर सदर ट्रक ताब्यात घेऊन तो जप्त करण्यात आला. नाशिक विभागात अशाप्रकारचे गुन्हे करणार्यांची माहिती घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. कदम यांच्या तपास पथकांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सदानंद मुरलीधर अमृतकर (रा.नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या इतर साथीदारांचीही माहिती दिली.मिळालेल्या माहितीवरुन, शहनशाह उर्फ सेबु गुलहसन (वय 20, सध्या रा.कुर्ला कसाईवाडा, मुंबई मुळ रा.दुबाही, ता.सोराव, जि. इलाहाबाद, राज्य उत्तरप्रदेश), महंमद जावीर शरीक शेख (वय 28, सध्या रा. कुरेला, ता.राणीगंज, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), हंसराज उर्फ मन्नु मुनेश्वर (वय 48, रा.कुर्ला, कसाईवाडा, मुंबई मूळ रा.तौकलपूर, पो.भिकनापूर, ता.राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश), महंमद जाकीर महंमद इलियास (वय 20, सध्या रा.संगमनगर पोलीस चौकी जवळ, अमर हॉटेलचे मागे, अॅन्टाँप हिल मुंबई मूळ रा.रेवासा, ता. राणीगंज, जि. प्रतापगड, राज्य उत्तरप्रदेश), बंटी उर्फ रोशन सुभाष खाबिया (वय 33, रा.नाशिक) या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांना नाशिक व मुंबई येथून अटक करण्यात आले.
त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडी असा एकूण 45 लाख 34 हजार 288 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दरोडेखोरांना पेण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता, त्यांची 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पेण उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एस.जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस उप निरीक्षक नरेंद्र पाटील, सहा.फौजदार भास्कर पाटील, पोलीस हवालदार पी.के. दोरे, राजेंद्र भोनकर, सतिश मेहेतर, पोलीस नाईक राकेश पवार, प्रतिक सावंत, संदीप देसाई, पोलीस शिपाई कैलास बेल्हेकर यांनी ही कामगिरी केली. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.एस.जाधव करीत आहेत.
Be First to Comment