बिहार विधानसभा निवडणूका बरोबरच ११ राज्यांच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. या पोटनिवडणूकांचे खास महत्व असल्याने याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. विशेषकरून मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूकांचे निकाल अर्थपूर्ण राहतील. मध्यप्रदेश मध्ये २८ जागांसाठी मतदान होणार आहे. याच्या निकालांवर तेथील सरकारची स्थिरता अवलंबून असेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ यांचे राजकिय भवितव्य या निकालांवर अवलंबून असेल.
जर या जागांचे समिकरण बघितले तर यापैकी अधिकाधिक जागा अशा आहेत जिथे २०१८ मध्ये भाजपाच्या राज्यस्तरिय प्रबळ नेत्यांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते. मात्र हेच काँग्रेसचे उमेदवार या पोटनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात असतील कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत त्यांनीही पक्षांतर केले आहे. पक्षांतर करणा-या सर्व काँग्रेसी नेत्यांना भाजपाकडून जर तिकिट देण्यात आलं तर भाजपाच्या जुन्या नेत्यांकडून बंडखोरीचे संकट भाजपासमोर निर्माण होवू शकत. पक्षामध्ये या मुद्दयावर विचारमंथन सुरू आहे. भाजपाच्या नेत्यांचा एक वर्ग असा आहे ज्यांचा जुन्या नेत्यांना डावलून काँग्रेस मधुन आलेल्या नेत्यांना तिकीट देण्यास विरोध आहे मात्र तरीही पक्षाला असे वाटते की, राज्यात शिवराज सिंह चौहान आणि नरेंद्र मोदी यांच्या नावावर या नाराजीवर मात केली जावू शकते. भाजपासाठी काँग्रेस मधुन आलेल्या नेत्यांना तिकीट देणे ही विवशता आहे कारण हे नेते याच अटीवर भाजपात आले होते.
१५ वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केल्यानंतर काँग्रेस राज्यात केवळ एक वर्षच सत्तेत राहु शकली. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पक्षांतर आणि त्यानंतर काँग्रेसची सत्ता जाणे हा काँग्रेससाठी मोठा आघात आहे तरीही काँग्रेसला असे वाटते की, त्यांच्याकडे एक संधी आहे. ती पलटवार करू ईच्छिते मात्र वेळ खूप कमी आहे. पक्षाने आपली ही ईच्छा जाहिर करताना म्हटले होते की, याच वर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर कमलनाथ यांच्या हस्ते तिरंगा फडकवला जाईल मात्र कोरोनामुळे या पोटनिवडणूका लांबल्या होत्या. काँग्रेसने आपल्या तयारीचे संकेत तेंव्हाही दिले होते जेंव्हा राज्याच्या २५ जागांवर निवडणूकीच्या तारखा येण्याअगोदरच त्यांनी आपले उमेदवार घोषित केले होते. तिला असे वाटते की, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्यापद्धतीने पक्षाने संघटन मजबुत करण्याचे काम केले आहे त्यामुळे परिस्थिती बदलेल. जर या २८ जागांपैकी २० जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला तर भाजपा सरकार समोर अस्तित्वाचे संकट उभे राहु शकते. पक्षाच्या नेत्यांनी असे म्हटले आहे की, आता पक्षाला गटबाजीची कसलीही भीती नाही आणि पक्षांतर करणा-या अधिकाधिक नेत्यांसमोर आपल्या अस्तित्वाचे संकट ऊभा टाकले आहे. कमलनाथ पहिल्यापेक्षा अधिक सक्रिय झाले असून त्यांनी ही पोटनिवडणूक आपल्या प्रतिष्ठेची बनवली आहे.
मात्र मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसला भविष्यातील नेतृत्वाचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे.दोन डझनहुन अधिक जागांवर होणा-या या पोटनिवडणूकीत पक्ष कशी वाटचाल करतो यावरून भविष्यातील नेतृत्व सुद्धा स्पष्ट होवू शकेल. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ आणि दिग्विजय सिंह यांचे पुत्र लक्ष्मण सिंह दोघेही राजकारणात सक्रिय झाले आहेत. जीतू पटवारी यांचा आलेख सुद्धा वेगाने उंचावत आहे. ज्योतिरादित्य यांच्या अनुपस्थितीत या युवा नेत्यांच्या समोर त्यांची पोकळी भरून काढण्याची संधी आहे.
उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा ८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. राज्यात २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक विधानसभा निवडणूका अगोदर ही सर्वात मोठी पोटनिवडणूक मानली जात आहे. या पोटनिवडणूकीत सर्वच राजकिय पक्षांना स्वत:ला पारखण्याची संधी मिळणार आहे. खरंतर पोटनिवडणूकीत सत्तारूढ पक्षाचा दबदबा असतो मात्र या पोटनिवडणूकीत सर्वांची नजर यावर असेल की, मुख्य विरोधी पक्ष म्हणून कोणता पक्ष समोर येतो. लोकसभा निवडणूकीत दरारून पराभव मिळाल्यानंतर अखिलेश यादव यांची एसपी आणि मायावती यांची बीएसपी यांच्यातील युती तुटली आहे. दोन्हीही राज्यात स्वत:ला मुख्य विरोधी पक्ष म्हणून सिद्ध करण्यात गुंतले आहेत. बीएसपी पोटनिवडणूकीत स्वत:ला वेगळी ठेवते मात्र या राजकिय वातावरणात ती काय निर्णय घेते हे पाहणे मनोरंजक असेल. ईकडे अखिलेश यादव यांचा पक्ष विस्तार करण्यात जुटला आहे. या सर्वांमध्ये प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस गेल्या काही वर्षात स्वत:ला राज्याचा सर्वात गंभीर पक्ष म्हणून सिद्ध करण्यात गुंतली आहे. प्रियंका यांना एकप्रकारे काँग्रेसने २०२२ मधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करून ठेवले आहे. अशात या पोटनिवडणूकीत काँग्रेसला हे सिद्ध करावे लागेल की, प्रियंका गांधी यांच्या सक्रियतेनंतर आता पक्ष राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवून आहे. या सर्वांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा हे सिद्ध करू ईच्छित असेल की, केंद्रापासुन राज्यापर्यंत त्यांचा दबदबा कायम आहे.
याचप्रमाणे गुजरातच्या आठ विधानसभा जागांसाठी होणारी पोटनिवडणूक सुद्धा तेथील विजय रूपाणी सरकारसाठी महत्वाची आहे. गेल्या काही महिन्यात गुजरातच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे बरेच आमदार भाजपात गेले आहेत. यामुळेच भाजपा राज्याच्या राज्यसभेची एक जागा काँग्रेसकडुन हिरावुन घेण्यात यशस्वी झाली होती. याला समांतर भाजपात सुद्धा अंतर्गत विवादाच्या बातम्या येत असतात. पक्षाने तिथे नुकताच आपला नविन अध्यक्ष नियुक्त केला आहे. दूसरीकडे काँग्रेसनेही मोठा निर्णय घेत हार्दिक पटेल यांना पक्षाचा अध्यक्ष बनवले. अशा पद्धतीने दोन्ही नवनियुक्त अध्यक्षांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी असेल. या तीन राज्यांव्यतिरिक्त कर्नाटक, झारखंड सोबत उत्तर पूर्व मध्ये सुद्धा काही जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत, यांच्या निकालांकडे देशाचा कल म्हणून पाहिले जाईल.
- सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क-९४०३६५०७२२
Be First to Comment